प्रस्तावना :-
आज दिनांक २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिमेला जीवदया लेन मध्ये आमच्या घराच्या जवळच म्हणजे अगदी चार इमारतींपलीकडे भर वस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्यात दोन वैमानिक, दोन तंत्रज्ञ तसेच एक पदपथी जागेवरच मरण पावला. आम्ही वाचलो. परमेश्वराची कृपा ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हेच खरे !
पण, बहुधा दोन्ही वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे व कौशल्यामुळे त्यांनी ते विमान आजूबाजूच्या शाळा, कॉलेज व उंच निवासी इमारतींवर आदळून अपरिमित जिवितहानी टाळण्यासाठी ते विमान बांधकाम चालू असलेल्या रिकाम्या जागी वळवले असावे.
त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस व त्या शूर वैमानिक मारिया झुबेरी व सहवैमानिक श्री.प्रदीप राजपूत यांनी दाखविलेल्या शौर्यास आणि प्रसंगावधानास लाख लाख प्रणाम ! त्यांना ही भावपूर्ण काव्यमय श्रद्धांजली !
प्रणाम वैमानिका !
प्रणाम तुज वैमानिका !
कौशल्य तव दिसले जगा
भरवस्ती विमान उतरविले
पाहून तू रिकामी जागा
प्राण देऊनि प्राण रक्षिले
शूरवीर तू जीवदा खरी
संसार तुझा मोडलास तू
काय म्हणावे वीर नारी !
संसार उधळले पाचांचे
खंत ना त्याची कुणा
धन दांडगे नराधम वाचती
दोष कुणाचा, शिक्षा कुणा
चौकशी शिक्षा सर्व होईल
जीव पुन्हा का परत येईल
मरती ज्यांचे त्यांनाच कळे
आपुला फक्त जीव कळवळे
रात्र होईल दिवस उगवेल
सारे सारे तसेच चालेल
आठवणींचे गुऱ्हाळ दिनभर
रात्र होता विसरतील नर
जगणे ना आपुल्या हाती
मरणाची ना उरली भीती
विस्मयकारक, दैव बलवत्तर
का वाचलो ? नाही उत्तर !
शाश्वती ना आयुष्याची
काय उद्याचे माहित नाही
उगाच चिंता भविष्याची
सत्कर्म सदा करीत राही
प्राण त्यागले घाटकोपरा
पवित्र केलेस या नगरा
वैमानिका तव स्मृतिस्तव
स्थळ हे आम्हा पावन धरा
देवदूत तू आम्हा नक्की
निधड्या छातीची तू पक्की
यमदूता अडविले हाती एका
प्रणाम तुज वैमानिका !
-प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(28.06.2018)
https://www.facebook.com/AsuChyaKavita