चारोळी पावसाची
क्रमांक-2
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
--ती कळी कधीपासून उदास होती , खिन्न होती , विचारात होती , प्रसन्न नव्हती , हसत नव्हती , फुलतं नव्हती , उमलतंच नव्हती . स्वच्छंदी वृत्तीने बागडणाऱ्या , उडणाऱ्या फुलपाखरास हे समजताच , त्याने तिला विचारले , हे कळये तू अशी का बरं आहेस , फुलतं नाहीस , खेळतं नाहीस , वाऱ्यासवे हलत नाहीस , डुलत नाहीस , काय बरे याचे कारण ? मी काय केले तर तुझी ही खिन्नता , उदासीनता दूर होऊन तू पुन्हा प्रसन्न होशील ? त्यावर कळी उत्तरली , हे सुंदर फुलपाखरा, यात कोणाचाही दोष नाहीय बरं ! मी माझ्या त्या मित्राची , माझ्या जीवनदात्याची , मला जीवन देणाऱ्या देवदूताची प्रकर्षाने वाट पाहात आहे . फुलपाखराच्या लक्षात आले की तिला खुलायला , फुलायला , उमलायला पावसाच्या सरींची ओढ लागली आहे , आणि त्याचीच ती वाट पाहात आहे .
हे कळताच फुलपाखरू कळीच्या कानाशी बिलगले , अन म्हणाले हे कळये , पहा तू इच्छा केलीस , अन पश्चिम दिशेवर ढग जमू लागलेत . त्यांची दाटी क्षणोक्षणी गडद होऊ लागली आहे . आणि आता थोड्याच वेळात सोसाट्याचा गार वारा सुटून ते पाहता पाहता बरसूही लागतील . आणि मग तुझ्या मनातली सारी इच्छा पूर्ण होईल . हे वृत्त कळते न कळते , तोच वर्षा -धारा सुरु झाल्या . पाहता पाहता पर्जन्य -धारांनी साऱ्या धरेस भिजवीत बागेतील त्या कळीसही पूर्ण भिजवून , तिच्या मनातली इच्छा पूर्ण केली . उत्फुल्ल कळी अतिशय खुश झाली होती , तिचे मन भरून आले होते . पावसाचे ती आभार मानत होती . आणि मग त्या फ़ुलपाखराने एक चमत्कार पहिला . आतापर्यंत उदास , खिन्न , न उमललेल्या कळीचे एका सुंदर फुलात रूपांतर झाले होते . आणि त्या फुलपाखरास मनोमन पटले की ही किमया , हा बदल , हा फरक घडवून आणण्याची ताकद फक्त पावसाच्या सरींतच आहे . बाकी हे कुणालाही जमणार नाही . खरोखरंच हा पाऊस सर्वांना आनंदी , मोहित करून सोडणारा , जीवन -दान देणारा , जीवन बदलणारा एक देव -दूतच आहे .
पाऊस व कळी
-----------------
आगमन पावसाचे झाले
वृत्त कळीच्या कानी गेले
मग कळीची कळी खुलून,
तिचे सुंदर फुल झाले.
==============
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.06.2022-सोमवार.