निर्णय
सोपं असतं का पोटच्या पोरीला सासरी पाठवणं
हाताच्या फोडागत जपलेल्या फुलाला दुसऱ्याच्या ओंजळीत देणं..
सोपं असतं का घर सोडून दुनियेच्या पसाऱ्यात झोकून देणं
मायेच्या विश्वातला विसावा ओलांडून स्वतःचं जग उभारणं..
सोपं असतं का अपयशानंतर पुन्हा सुरुवात करणं
यशाच्या सूर्याच्या अपेक्षेने अंधारलेल्या खाचखळग्यात उभं होणं..
सोपं असतं का नशिबानी दिलेल्या धक्यांना पचवणं
आलेली वादळं झेलत झेलत खंबीरपणे पुढे जात राहणं..
सोपं नसतं असे कठीण निर्णय घेत जाणं ..
काही सोडून आणि काही धरून आयुष्याचा समतोल साधणं..
निर्णय घेणं जितकं, तितकच त्याला निभावणंही कठीण
जीवनाचं गणित म्हणजे ह्या निर्णयांचं सुरेख समीकरण बांधणं...