"शंभर टक्के-हंड्रेड परसेंट"
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, श्री कोहम यांच्या "शंभर टक्के-हंड्रेड परसेंट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "नातू अँड बाळ-बाळ"
नातू अँड बाळ-बाळ--क्रमांक-१--
----------------------------
शेवटी एकदाचं सीमाला देवळातून बाहेर काढून आम्ही पांढरे आइसक्रीमच्या समोर पोचलो. काउंटरवर पांढरे बसले होते. त्यांचा रंग काळा कुळकुळीत होता. कुणाचा रंग कसा असावा ह्याबाबत माझी काही मतं नाहीत. माझा स्वतःचाच रंग गोरा नाही. म्हणजे खाजगीतही मी सावळा आहे वगैरे म्हणण्याचं धाडस मी करू शकत नाही. पण इतक्या काळ्या माणसाचं नाव देवाने पांढरे का ठेवावं ह्याचंच मला आश्चर्य वाटून राहिलेलं. पांढरे आणि त्यांची आइसक्रीम्स ह्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी पायऱ्या चढायला लागलो.
पायऱ्या भारी उंच होत्या, त्यामुळे मी पटकन पुढे झालो चढायला. आता अशा उंचच उंच पायऱ्यांवर चढताना मुलगी पुढे असली म्हणजे दोन पायऱ्या सोडून चालावं लागतं. तसं केलं म्हणजे डोळ्यासमोर सभ्य मुलाने जिथे एकटक नजर लावून बघायला नको ते येतं. धड पुढेही बघता येत नाही, धड खालीही बघता येत नाही. थांबलो आणि उगाच पुढची मुलगी थांबली तर नको तो अपघात होण्याचा धोका. समोर पाहिलं तर मला चुकून कुणी पाहत असेल तर इमेज खराब होण्याचा धोका. हे सगळं दिव्य टाळण्यासाठी म्हणून मी पुढे झालो खरा पण त्यामुळे दरवाज्याशी मी पहिला पोचलो. आणि बेल दाबून आतल्या नातवा बाळांशी बोलायची माझ्या पिटुकल्या खांद्यांना न पेलवणारी जबाबदारी माझ्या अंगावर येऊन पोचली. बरोबर रश्मी आणि सीमा असल्याने पचका होऊन चालणार नव्हतं. अशा वेळी मला दुसऱ्या नंबरवर राहायला आवडतं. म्हणजे बोलण्याची जोखीम आपल्या डोक्यावर नसते पण आतल्या माणसाला आपण नक्की दिसतो.
तर मी बेल दाबली. एक अतिशय नम्र अदबशीर वगैरे वाटणारा माणूस दरवाजा उघडायला आला. मला वाटलं आनंद बाळ आले. आम्ही कोण हे अर्थातच त्यांना कळलं नाही. तो काही बोलणार इतक्यात मीच दामटवून म्हणालो.
"हॅलो. आय ऍम मायसेल्फ पांडुरंग जोशी अलाँग वुइथ माय फ्रेंडस हॅव्ह कम टू सी यू" हुश्श.
इतकं मोठं इंग्रजी वाक्य एका दमात बोलण्याची वेळ ह्या आधी माझ्यावर आलेली नव्हती. जीना चढताना अख्खा वेळ मी ह्या वाक्याची जुळवाजुळव करीत होतो. आता ते बोलून टाकल्यावर माझ्या मनावरचा ताण हलका झाला. पण आलेल्या माणसाने पुन्हा एकदा आम्हा तिघांना निरखून पाहिलं आणि म्हणाला
"कोण पाहिजे"
"आम्हाला तुम्हाला भेटायचंय"
"कुणाला"
"तुम्हाला सर"
"मला? थट्टा करू नका. लवकर बोला कुणाला भेटायचंय."
माझी एकंदरीतच वळलेली बोबडी पाहून रश्मीनं सूत्र तिच्या हाती घ्यायचं ठरवलं.
"आनंद बाळ आहेत का? माझं नाव रश्मी आम्हा तिघांना त्यांनी भेटायला बोलावलं होतं"
" मग अस्सं सांगा ना. सांगतो सायबांना. या तुम्ही बसा"
--कोहम.
(Tuesday, July 28, 2009)
----------------------------
(साभार आणि सौजन्य-शंभर टक्के.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.