"माझी मी"
----------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, श्रीमती जयश्री यांच्या "माझी मी" या कविता ब्लॉग मधील एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "गारवा"
आभाळ भरुन आलं ना......की तुझी आठवण अनावर होते रे! अगदी त्याच क्षणी तू हवा असतोस ! गच्च भरुन आलेलं आभाळ, तो खट्याळ वारा, भुरभुरता पाऊस...... सगळे एकच मागणं मागत असतात..... तू हवा...तू हवा.........
गारवा--
------
गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा
नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा
झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा
वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा
भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा
(ह्या माझ्या कवितेचं विवेक काजरेकरांनी खूपच मस्त रोमँटिक गाणं बनवलंय. "स्पर्श चांदण्यांचे" या अल्बममधे पद्मजा फ़ेणाणींनी ते गायलंय देखील सुरेख!)
--जयश्री
(SATURDAY, DECEMBER 30, 2006)
--------------------------------------
(साभार आणि सौजन्य-माझी मी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
-------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.