"मला आवडलेला लेख"
लेख क्रमांक-64
---------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.२"
ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
--------------------------------------------------------------------------
"सतत नऊ वर्षे एकसारखे लढून ग्रीकांच्या ताब्यात मी १२ शहरे अन ११ बेटे आणली त्याची कुणाला पर्वा नाही. मी लढाईत असेपर्यंत हेक्टरची जहाजांपर्यंत यायची छाती झाली नाही. हाती आलेल्या लुटीचा थोडासा हिस्सा इतरांना देऊन मुख्य वाटा स्वतःसाठीच ठेवणारा तो हावरट अॅगॅमेम्नॉन-इतर कुणालाही सोडून फक्त माझ्याकडूनच त्याने ब्रिसीसला काढून घेतले-मला ती आवडायची, तरीसुद्धा! स्वत:च्या बायकोसाठीच तर हे युद्ध चाललंय ना? अख्ख्या जगात मेनेलॉस सोडून कुणाच्या बायका कधी हरवल्या नाहीत काय? तरीही हे बायकांसाठी युद्ध करतात, आणि वर तोंड करून मलाच म्हणतात की कशाला ब्रिसीससारख्या क्षुल्लक पोरीवरून कशाला उगीच भांडतोस म्हणून. मरा लेको. उद्याच्या उद्या मी तरी निघालो माझ्या घरी. पेलिअस (अकीलिसचा बाप) माझ्यासाठी चांगली ग्रीक बायको बघून ठेवेल, मला चिंता नाही त्याची. तो कुत्रा अॅगॅमेम्नॉन मला आत्ता जितके देऊ पाहतोय त्याच्या वीसपट जरी दिले तरी मला नकोय. इजिप्तमधील थीब्स सारखे अख्ख्या दुनियेत श्रीमंत असलेले शहर देऊ केले तरी नकोच. त्यामुळे माझा राग निवळेस्तोवर मी काही लढणार नाही. आपली जान प्यारी असेल तर दुसरा काही प्लॅन करा जावा."
हे निर्वाणीचे उत्तर ऐकून अजॅक्सने नापसंती दर्शवली आणि अकीलिसला पुनर्विचार करण्याची विनंती केली. अकीलिस म्हणाला, की अजॅक्सचे म्हण्णे तसे खरे आहे, पण भर सभेत सर्वांदेखत अॅगॅमेम्नॉनने जो अपमान केला तो आठवल्यावर आजही पित्त खवळते-इलाज नाही. मग गप वाईन पिऊन थोरला अजॅक्स आणि ओडीसिअस गेले अॅगॅमेम्नॉनकडे. अकीलिसचा जबाब ऐकून डायोमीड म्हणाला, की अकीलिस फार गर्विष्ठ आहे. त्याला वाटेल तेव्हा तो लढूदे. तोपर्यंत आपण आपले काम करू. तूर्त रात्रीची विश्रांती घेऊ आणि उद्या नीट लढण्याच्या बेताची आखणी करू. याला सर्वांनी संमती दिली आणि सर्वजण झोपून गेले.
डायोमीड आणि ओडीसिअसने अंधारात उडविलेली कत्तल.
अकीलिसने लढायला नकार दिल्यावर अॅगॅमेम्नॉनची झोप हराम झाली होती. तो अंथरुणातून उठला, फ्रस्ट्रेशनमुळे त्याने आपल्या डोक्यावरचे काही केसच उपटून काढले आणि जोरात ओरडू लागला. त्याला कळायचे बंद झाले होते. शेवटी तो तयार झाला, मेनेलॉस, नेस्टॉर, डायोमीड, ओडीसिअस, इ. चीफ लोकांना घेऊन मसलत सुरू केली.
मगाशी सांगितल्याप्रमाणे हेक्टरने ग्रीकांवर नजर ठेवण्यासाठी ट्रोजन सैनिकांना नियुक्त केले होते. त्यांनी पेटवलेल्या शेकडो शेकोट्या अंधारात दिसत होत्या. ट्रोजनांचा नक्की बेत काय आहे-ते इथेच थांबणार की शहरात परत जाणार की लगेच हल्ला करणार हे कळावे यासाठी एकदोघा दबंग ग्रीकांनी त्यांच्यापर्यंत जावे असा प्रस्ताव नेस्टॉरने मांडला. पण हे पडलं जोखमीचं काम. कोण करणार? अपेक्षेप्रमाणे डायोमीड पुढे आलाच. पण त्याने अजून एकाची मागणी केली. कित्येकांनी त्याबरोबर जायची तयारी दर्शवली. शेवटी अॅगॅमेम्नॉनचे मत पडले की डायोमीडनेच बेस्ट साथीदार निवडावा. शेवटी त्याने ओडीसिअसची निवड केली. दोघांनी मिनर्व्हा देवीची प्रार्थना केली, इतरांनी दिलेली शस्त्रे घेतली आणि ते ट्रोजनांच्या दिशेने निघाले.
(क्रमशः)--
--------
(March 20, 2013)
--------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2023-मंगळवार.