मित्र/मैत्रिणींनो,
आज शनिवार, माझ्या हनुमानाचा, मारुतीरायाचा वार. सर्वांनी या बलाची, शक्तीची पूजा करून, स्तोत्र पठण करून, त्याचे स्तवन करूया. ऐकुया हनुमानाचे एक भक्ती-भजन-गीत. या भजन-गाण्याचे शीर्षक आहे- "प्रणिपात माझा, तुजला रामदूता"
"प्रणिपात माझा, तुजला रामदूता"
-----------------------------
अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान I
एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान II
राम लक्ष्मण जानकी,
जय बोलो हनुमान की I
भीमरूपी महारुद्रा, वज्र-हनुमान मारुती I
वनारी अंजनीसुता, रामदूता प्रभंजना II
जन्मताच तू, सूर्याशी धरिले
लालतांबडे फळ खाण्या, उड्डाण तू केले
बाळलीलेने सारे देव, अचंभित झाले
धन्य ती अंजनी, धन्य तू अंजनी-सुता,
प्रणिपात माझा, तुजला रामदूता.
सातासमुद्रापल्याड, उड्डाण तू केले
लंकेत रावणाच्या, महापराक्रम केले
मूर्च्छित लक्ष्मणा शुद्ध येण्या
उचलून अणिलेस, द्रोणागिरी पर्वता,
प्रणिपात माझा, तुजला रामदूता.
श्रीराम तुझा पिता, लक्ष्मण तुझा भ्राता
जानकीस मानिले, तू तुझी माता
ह्रदयी देऊन तयांना स्थान
भक्तिभावे नमिलास, पायांशी बसता,
प्रणिपात माझा, तुजला रामदूता.
अमरत्त्वाचे तुज वरदान लाभले
सप्त-चिरंजीवी मध्ये, तुझे स्थान एकले
भुभुकारे तुझ्या, स्वर्ग-धरा-पाताळ डळमळले
दर्शन घडतेय, तुझेही आता,
नमस्कार माझा, तुजला रामदूता.
महा-बलशाली तू, वज्र-देही तू
महा-पराक्रमी तू, भीम-रुपी तू
महा-शक्तिशाली तू ,बलाची देवता
नमितो तुजला, तू बुद्धीचाही दाता,
नमस्कार माझा, तुजला रामदूता.
मारुती-राया, तुझ्या आलो मी देऊळी
रुई पुष्प-पानांची, तुज माला अर्पियली
शेंदूर तेलाची तुज, उटी मी लावली
मज देई वर, प्रसन्न होऊनिया आता,
नमस्कार माझा, तुजला रामदूता.
शनिवारी रोज, तुझ्या मंदिरी मी येतो
तुझ्या स्तोत्राचे, नित्य पठण करितो
गर्जत आळवुनी, तुझी आरती मी गातो
तल्लीन होतो मी, तुझे गुण गाता गाता,
नमस्कार माझा, तुजला रामदूता.
आणिक मागणे माझे काही नाही
नित्य राहा वास्तवास, माझिया हृदयी
तुझे अस्तित्त्व नित, देत राहील ग्वाही,
पाद-चरण करितो पूजा, मी रोज स्वतः,
प्रणिपात माझा, तुजला रामदूता,
नमस्कार माझा, तुजला रामदूता.
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2023-शनिवार.
=========================================