Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Song,Ghazal & lavani lyrics => Topic started by: Atul Kaviraje on November 07, 2023, 10:14:25 PM

Title: काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !-श्रावण बाळ
Post by: Atul Kaviraje on November 07, 2023, 10:14:25 PM
                     "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !"
                   --------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "श्रावण बाळ"

                                  "श्रावण बाळ"
                                 -------------

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा

मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला
मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला

त्यां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ
परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी

--कवी- ग.ह.पाटील
------------------

--प्रकाशक : शंतनू देव
(THURSDAY, DECEMBER 23, 2010)
---------------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.11.2023-मंगळवार.
=========================================