मित्रांनो, आज पुन्हा वाचूया बर्फातल्या एका रम्य आणि सुंदर संध्याकाळचे कवितारूपी वर्णन--
किती रम्य देखावा माझ्या समोरचा
पश्चिमेस प्रवास चाललाय अजुनी सूर्याचा
अजूनही प्रकाशतोय, किरणे अपुली पखरतोय,
विझता-विझता धरेस जीवन देऊन जातोय.
फारच सुंदर आहे आजची संध्याकाळ
प्रदेश आहे हा शुभ्र बर्फाळ
बर्फ चमकतेय, त्यावर पडलेल्या किरणांनी,
उधळतेय चमक शुभ्रतेची सर्व बाजुंनी.
काठ तलावाचा बर्फाने झाकून गेलाय
धवल रंगाने परिसर व्यापून राहीलाय
घरंगळत सूर्यकिरणे तळ्यात करताहेत प्रवेश,
फारच रमणीय भासतोय बर्फाचा प्रदेश.
आजची रम्य संध्याकाळ बर्फातली आहे
तळ्याला पूर्णपणे वनराईने घेरलेले आहे
मोकळी जागा सोडता येथली दुरवरली,
सारा भूभाग बर्फ़ानेच व्यापला आहे.
प्रतिबिंब लाल-तांबडे तळ्यात आहे पडलेले
तळे पूर्ण पिवळ्या रंगाने झाकलेले
प्रतिबिंबही परावर्तित करताहेत चमकती किरणे,
अंध करताहेत, नयनांचे फेडताहेत पारणे.
आकाश आहे मोकळे, ढगहीन निळे
जेमतेम पोचतेय किरण सूर्याचे पिवळे
आताशी मंदावू लागलीय धग सूर्याची,
आग झालीय सौम्य, दहकत्या किरणांची.
किरणांची तीव्रता होऊ लागलीय कमी
वातावरणात येत चाललीय शीतलता, नमी
सूर्याचा कमी झालाय आतासा प्रभाव,
थंडीचा होऊ लागलाय हळूहळू शिरकाव.
पाणी अजुनी चमकदार आहे तळ्याचे
किरण अजूनही होतेय परावर्तित सूर्याचे
पाण्याला आलीय लाल-तांबडी, पिवळी आभा,
नयनांत साठवतोय मी सूर्यकिरणांची प्रभा.
जळ शांत आहे, आहे निवांत
कुणीही नसल्याची आहे मला खंत
सुंदर नजारा पाहण्यास मीच आहे,
चिटपाखरूही नाही, निरव शांतता आहे.
पानगळ होऊन गेलीय, झाडे सुकलीत
जीर्ण शीर्ण अवस्था, निष्पर्ण झालीत
फांद्याफांद्यांवर साठलेत जाड बर्फाचे थर,
झाडाने प्रत्येक ओढलीय शुभ्रतेची चादर.
ही आहे बर्फातली अनोखी संध्याकाळ
शांत, शीतल, बोचरी, थंड संध्याकाळ
गारवा आतापासूनच वाढलाय, दाटू लागलाय,
अंगावर सरसर शहारा येऊ लागलाय.
रात्र व्हायला अजूनही अवकाश आहे
अजुनी पश्चिमेवर दिनमणीचे राज्य आहे
डोळ्यांत साठवून ठेवतोय सुंदर नजारा,
मावळत्या सूर्याला माझा मनापासून मुजरा.
--अतुल परब
--दिनांक-02.10.2024-बुधवार.
==========================================================