ज्योत मराठी बोलीची
का लवलवते आहे ?
असुनी मुखे लाख मराठी
का मग मराठी वगळते आहे ?
ऊठ कलाकारा, जागा हो...
माय तुला साद घालते आहे.
कथा-कादंबऱ्या, ग्रंथ, वेद-पुराणे
साहित्य मराठी धूळ खात आहे.
सिनेमे, नाटके, लावणी, पोवाडे,
कला मराठी ढासळली जात आहे.
ऊठ कलाकारा, जागा हो...
माय तुला साद घालते आहे.
वाव नाही म्हणून, सोडलीस लेखणी
कलाकारा, इथे तुझी कला ढासळली.
भाव नाही म्हणून बदललीस बोली
मराठीपुत्रा, इथे तुझी मराठी माया ढासळली.
ऊठ कलाकारा, जागा हो...
माय तुला साद घालते आहे.
तोड मर्द मराठ्या, श्रुंखला बंधनांच्या
दाखवून दे जगाला, कला मराठी लेकरांच्या.
होऊ नको रे तूच हतबल, हे मराठी माणसा
तूच आहेस या मराठी आईचा वारसा.
ऊठ कलाकारा, जागा हो...
माय तुला साद घालते आहे.
बहु असतील राष्ट्रभाषा,
बहु असतील आंतरराष्ट्र भाषा.
विसरू नको हि मराठी बोली
विसरू नको संस्कृती मराठमोळी.
ऊठ कलाकारा, जागा हो...
माय तुला साद घालते आहे.
(मराठी कलाकारांकडून आणि पुत्रांकडून एक वचन हवय)
वाचेल जग साहित्य सोनेरी, तुझ्या लेखणीचे
गायिल जग पोवाडे, तुझ्या कलेचे.
घालील जग मायेला, मुजरा मराठमोळी
इच्छितो इतकेची कलाकारा, आशापुत्र हात जोडी.
ऊठ कलाकारा, जागा हो...
माय तुला साद घालते आहे.
-प्रशांत बा. नागरगोजे (आशापुत्र)
दि. ११/०४/२०१२
ठिकाण: सांगली
visit my blog www.prashu-mypoems.blogspot.com
मला वाटत मराठीचा प्रसार न व्हायला हेच कारण आहे. आपण तीला मैत्रीण बनवली आस्ती तर खचितच तीला सगळीकडे आपल्या बरोबर घेऊन गेलो असतो.
बनवलत मला तुम्ही
माय मराठी
तुम्ही गेलात दूरदेशी
मी मात्र राहिले घराशी
केदार...
मराठी असेल मैत्रीण वा माय
प्रश्न ज्याचा त्याचा.
हा तर एक प्रयत्न होय
मराठीचा वर्तमान सांगण्याचा.
दूरदेशी तिला घेऊन जाईन
हा जन्म तिच्या लेकराचा.
नक्की तुम्हांस कळवीन
पराक्रम तुमच्या मैत्रिणीचा.
मराठीचा अभिमान बाळगून मी उराशी
लेखणी घेतली हाती तिच्या साठी दूरदेशी
" मराठी असे आमची मायबोली"
हृदयात जपल्या ह्या कवितेच्या ओळी
जेंव्हा अमेरिकेत राहत होतो तेंव्हा तिथे प्रकाशित होणाऱ्या ' एकता ' ह्या त्रैमासिकात ' अमेरिकेत भेटलेली मराठी माणसे ' हा लेख लिहिला होता.
जेंव्हा जपान मध्ये राहत होतो तेंव्हा टोक्यो मराठी मंडळाच्या site च्या साहित्य सदरात 'साकुरा' हि कविता लिहिली होती.
" मराठी असे आमची मायबोली" हि ' माधव जुलियन ' ह्यांची कविता खालील लिंक वर जरूर वाचा
http://www.aathavanitli-gani.com/Song/Marathi_Ase_Aamuchi
आणि ऐका
http://www.in.com/music/track-marathi-ase-aamuchi-maayboli-191479.html
प्रसादजी खूपच छान.
तुम्ही मराठीला दूरदेशी नेलात याचा या मराठी माणसाला नेहमीच अभिमान असेल.
ती मराठी माय प्रत्येकाला हे बळ देवो हि इच्छा.
" मराठी असे आमची मायबोली" या कवितेची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
मराठीच्या रत्नमय गाभाऱ्यात तुमच्याकडून आणि प्रत्येक मराठी कलाकाराकडून मौल्यवान रत्नांची भर पडावी,
हि ईश्वर चरणी प्रार्थना. :)
http://mybolikawita.blogspot.com/2011/07/blog-post_2148.html मधे मला खालच्या दोन कविता सापडल्या. पहिली प्रख्यात माधव ज्यूलियन कवींची "मराठी असे आमुची मायबोली" ही कविता आहे आणि दुसरी तितक्याच प्रख्यात केशव शिवकुमार कवींची "मरांग्रजी आमुची नवी मायबोली" ही कविता आहे.
मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे
जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजी
जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता, थोरवी
असू दूर पेशावरी, उत्तरी वा
असू दक्षिणी दूर तंजावरी
मराठी असे आमुची मायबोली
अहो ज्ञानदेवीच देखा खरी
मराठी असे आमुची मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असू
पुरी बाणली बंधुता अंतरंगी
हिच्या एक ताटांत आम्ही बसू
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे
हिला बैसवू वैभवाच्या शिरी
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा
नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा
पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची
हिरे मोतियांचे हिला दागिने
"मराठी असे आमुची मायबोली"
वृथा ही बढाई सुकार्याविणे
मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-
मुळे खोल कालार्णवाच्या तळी
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्ने
नियोजू तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी
कवी : माधव ज्यूलियन
========================
मरांग्रजी आमुची नवी मायबोली
मराठी जरी आमुची मायबोली
अम्हा ही भाषा न प्रसन्न दिसे
नसे आज ऐश्वर्य या माउलीला
अन् आशा यशाची मोजकी असे
घेतसे पंचखंडातही मान्यता जी
कशाहीमुळे श्रीमती इंग्रजी
न बोलता ये वा न लिहिता
भाषाही ती अम्हा फारशी
"राष्ट्रभाषा" अशी मान्यता हिंदीस आज
जरी होती झाली तत्संबंध वादावादी
असो ते, "मराठी" मरांग्रजीस ध्याती
चाणाक्ष जाणतीलच "मरांग्रजी" उपाधी
असू दूर पेशावरी, उत्तरी वा
असू दक्षिणी दूर तंजावरी
मरांग्रजी ही "मराठी" मायबोली
वस्तुस्थिती ही नवी खरी
मरांग्रजी आमुची नवी मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असू
पुरी भिनली ती असे अंतरंगी
तिच्या अंमलात आम्ही असू
तिचे पुत्र आम्ही ती "फाडफाड" बोलू
चांगल्या मराठीस लावुनी सुरी
"जगन्मान्यता" तीस अर्पू सहजी
तिला बैसवूनी कट्ट्याकट्ट्यांवरी
मराठीच्या चिंध्यांची नसे लाज आम्हा
पहायचे कशासी तिच्या लक्तरां
मरांग्रजीचे प्रभावी रूप चापल्य जाणा
संमत असे ती सर्वां साक्षरां
न घालण्या समर्थ आम्ही
मराठीवरी दागिने
"मराठी असे आमुची मायबोली"
अशी बढाई परी आम्ही करणे
मराठी मायबोली अमुच्या
पुर्या गबाळेपणी खंगली
तिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-
मुळे खोल कालार्णवाच्या तळी
वाक्यरचना, व्याकरण; शिवाय
शुद्धलेखन आणि विरामचिह्ने -
गबाळेपणा तत्संबंधित परम
संपण्याची न दिसती चिह्ने
धन्यवाद सुदर्शन दर्शने....
तुम्ही पोस्ट केलेल्या कविता वाचल्या.
मराठीच्या अस्तित्वाची जाण होतीच, पण माय मराठीची हि परिस्थिती खूप आधीपासून आहे हे माहित नव्हत. माझ्याकडूनही मराठी लिहिताना चुका होतात, त्या दुरुस्त करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
तुमच्यामुळे दोन खूप चांगल्या कविता वाचण्यास भेटल्या. तुमचे पुन्हा मनापासून धन्यवाद.
I Like.........
धन्यवाद पिंकी :)
very nice poem. i like it.
धन्यवाद अण्णा अडसरे :)