=1=
तुला पाहून माझ्या
मनात दाटले प्रेम
तुझे नी माझे
सारेच वाटले सेम।
ओळख व्हावी असं
सारखं वाटलं होतं
समोर येता जिभेवारच
पाणी मात्र आटत होतं।
आडोशामागुन मग
तुला मी बघायचो
भूमिगत प्रेमावीराच
जीवन मी जगायाचो।
तुझं हसण मोकळ
अन् मोहक चालण
आवाज तुझा मंजुळ
अन् मधुर बोलण।
तुझ्यापेक्षा तुला मीच
अधिक ओळखू लागलो
तव स्मृतींच्या पुष्पातला
मध चाखू लागलो।
दूरच्या टेकडीवर जेव्हा
वारा शीळ घाले
तुझ्या स्मृती देऊन
आतड्यास पीळ घाले।
स्वप्नांच्या क्षितीजावर
तूच तरळत असे
अन् श्वासांच्या संगात
तूच दरवळत असे।
आताशा स्वप्नांना मात्र
अर्थ आला होता
वाटल...आतापर्यंतचा काळ
व्यर्थ गेला होता।
स्वप्न नुसती पहावी किती
गेलो मी कन्टाळून
ठरवल....
टाकायच एकदा विचारून।
------------------------------
सारंग भणगे.
============================================================
=2=
त्या दिवशी मी
आलो छान नटून
म्हटल एकदा
पहाव तरी भेटून।
तुला दुरून पाहता
गेलो मी बावरुन
जवळ यायच्या आत
स्वत:ला घेतल सावरून।
जवळ जशी येता तू
श्वास माझे दुणावले
अन् छातीमधले ठोके
माझे मलाच जाणवले।
उभा समोर राहता
गेलो पार गडबडून
अजाणता मग
काहीतरी बडबडून।
हसतच ओठात तू
हातात वही ठेवली
अन् हासत तुझ्या जाण्याने
सारी आग निवली।
पण आता पडला प्रश्न
काय मी बोललो?
भितीच्या पुंगीवर
कसा मी डोललो।
घाम पुसत मी
वही तुझी उघडली
अन् तुझ्या मनाची
घडी उलगडली।
शब्दकळ्या त्या पाहून
गाठ प्रेमाची सांधली
तू माझा 'सारंग'
मी तुझी 'गंधाली'।
अर्थ जसा कळला
भीती सारी पळाली
तुझ्या मनातली
नाती माझी कळाली।
------------------------------
सारंग भणगे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
=3=
मनोद्यानामध्ये
हास्यफुले उमलली
अन् हर्षाच्या आकाशी
इंद्रधनूषे उमटली।
आनंदाचे धबधबे
उसळून वाहिले
मानस सरोवर
हर्षलहरींनी व्यापिले।
निळ्या विभोर आकाशी
हर्षपक्षी उडाले
हर्ष - वायु संगे
प्रेमसंकेत धाडिले।
सूर्यकिरणातही
नकळत मार्दव आले
चन्द्ररश्मी भासूनी
मन चकोरेव झाले।
पुष्पसंचातील
झाल्या गंधित कालिका
अवसेला नभात होत्या
लुकलुकत तारका।
विश्व मोहर आला
आनंदाचा कहर झाला
मनाच्या बागेमध्ये
फुलांना बहर आला।
अलंकापुरी नटली हृदयी
लेउनी हर्षलंकार
मनाच्या मृदंगावरी
उमटले हर्षझंकार।
कल्पवृक्ष कल्पनेतला
आज सत्यात आला
गगन झाले ठेन्गणे
स्वर्ग वितात आला।
स्वप्नालाही सत्याचे
पंख मिळतात तर
कालसर्पाच्या दंती
अमृतडंख असतात तर।
आज हां 'सारंग'
गंधमय झाला
अन् गंधालीचा संग
सारंगमय झाला।
------------------
सारंग भणगे
Atishay Sundar....................
Mast :)