लगीन
लगीन केल अग्नी साक्षी तेव्हा पासून पाहते
माझ्या कुंकवाची किंमत मी क्षणोक्षणी मोजते
बापान विकली जमीन अन दिला हुंडा
चोर झाला जावई सासरा अन घातला गंडा
टी.व्ही .फ्रीज घरात माझ्या रोजच मी पाहते
थंड पाणी पिता पिता रोजच अश्रूतून न्हाते
कपाट पलंग भांडी कुंडी सारेच नवे चकाचक
माझ्या संसाराच्या उभारणीसाठी बापाने मारली झक
कुठे लग्न झाले माझे झाला खुला व्यापार
माझ्या कुंकवाचा टीळ्यासाठी बा जिवंतपणी ठार
पडली गहन काळी आई कर्ज नाहीच फिटणार
दुष्काळाची छाया आता आणखी गडद होणार
नवरोबाला मिळाला हुंडा घरासाठी बाई
सासूसासरे त्यात सामील त्यांना मिलाई दाई
गुमान भोगण्या पलीकडे नाही काही उपाय
बाप बनण्याची नवरोबाला नको तितकी घाय
साज,शृंगार मैत्री यांना काहीच नव्हता अर्थ
बायको म्हणजे सहचारणी हे शब्दच होते व्यर्थ
अजब होता व्यवहार पैसे देवून आणली बाई
ओरबाडून सुख लुटण्याची त्याला नेहमी घाई
दिवस रात्र राबल्यावर तरंच उरत नाही
तो मात्र लांडग्या सारखे लचके तोडत राही
आत्ता ह्या शरीराच वैभव शिल्लक नाही
खुर्पटत जगण्यापलीकडे काहीच उरल नाही
मंगेश कोचरेकर