बरं झालं तु निघुन गेलास

Started by GANESH911, January 02, 2013, 04:00:39 PM

Previous topic - Next topic

GANESH911

हे एक बरं झालं तु निघुन गेलास
माझा मार्ग मला मोकळा केलास

उगाच घुट्मळत राहिला असतास
आणी सगळ्याची जाणीव करुन देत राहिला असतास

वर या जाणीवांनी जिव नकोसा केला असता
आणी तुझा भार मला पेलवला नसता

आता मी डोळे मिटुन सारे बघु शकतो
सगळ्याच जाणीवा बोथट करुन घेउ शकतो

तु असतास तर ह्रुदय धडकवलं असतं
अन्याया विरोधात कधी भडकवलं असतं

आता मी सारे काही ऎकुन घेतो
मनाचे सारे आवाज दाबुन टाकतो

तु होतास तेव्हा कशावरही लगेच पेटवायचा
कुणासाठीही डोळ्यांमध्ये अश्रु दाटवायचा

तु असतास तर ही लबाडी कुठे खपली असती
लाज, लज्जा ,शरम का अशी लपली असती

असही अंतरात्म्याचं ईथे कामच काय होतं
माणुस म्हणुन जगायला इथे माणूस कोण होतं

आता बघ मी कसा निलाजरा जगतो
कोडगेपणाची कपडे रोज अंगावर घालतो

तु थांबला असतास तरी रोज हरावं लागलं असतं
तुझ कर्ज मागाहुन मला भरावं लागलं असतं

तु नाही तरी मी माझे काही श्वास धरतो आहे
तुझ्यावाचुन उरलेल्या शरिराला रोज थोडं पुरतो आहे



गणेश शिवदे

केदार मेहेंदळे


GANESH911