कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

shashaank

क्या बात है...
मी आत्ताच एक स्वरचित भुजंगप्रयात देणार होतो तो तुझे हे नेमके व अभ्यासपूर्ण विवेचन वाचनात आले -

किती दाटती मेघ हे अंतराळी
किती रेशमाच्या झडींची नव्हाळी
त्वरेने निघावे सुसाटून तू रे
असा पावसाळा पुन्हा नाहि येणे


shashaank

श्रावणाचा सूर वेडा
गाई सरीतून गाणे
माधवाच्या बासरीचे
नभ छेडती तराणे

चिंब झाली रानराई
मेघ ओंजळीत आले
झरे कपारी भरून
सूर होवुनी निघाले
वारा पानाशी खेळतो
खेळ कोणता नव्याने

"माती" ओलावा धरून
गंध वाहतो मोहतो
दरीतून गवताची
गर्द शाल पांघरतो
रूप मायावी देखणे
फिटे डोळ्याचे पारणे

माधवाच्या बासरीचे
नभ छेडती तराणे


अंबरीष देशपांडे  - यांची एक सुंदर अष्टाक्षरी - इथे "माती" ऐवजी "भुई" हा शब्द जास्त चपखल वाटतो - लयीच्या दृष्टीने - बघ ....


मिलिंद कुंभारे

शशांक मित्रा,
तसे नाही... हा विषयावर आधीच खूप वाद झालाय .... मलाही वाटते आपण कवितेतले अलंकार, वृत्त समजून घेतले पाहिजे ....
तू काल सांगितलेले सोपे फार्म वाचून मलाही वाटले कि आपणही कविता लिहू शकतो ... तशी मनात रुची निर्माण झाली ....
मी तुझी परीक्षा घेत नाही आहे ... मी काही कवी नाही......
फक्त मनातल्या शंका विचारतोय जेणेकरून मीच नव्हे तर MK वर येणारे बाकी कवीही त्याचा लाभ घेतील ....
पण आता कळले कविता लिहिणे वाटते तेवढे सोपे नाही ... वृत, अलंकार, मात्रा ह्यांची जाण असणे महत्वाचे आहे ....

मित्रा,
मुक्तछन्द काय असते ह्याबद्दल थोडे सांगशील काय ??? :)

shashaank

कविता म्हणजे अल्पाक्षर व रमणीयत्व -बाय डेफिनेशन. आणि ते खरेही आहे. पण खूप छंद, वृत्त, मात्रा यामधे कविता अडकल्यामुळे मुक्तछंद हा प्रकार आला -ज्यात हे काहीही (छंद, वृत्त, मात्रा, गण, यमक वगैरे) पाळले जात नाही. मुक्तछंदात थेट अभिव्यक्ति असते.
उदा.
यावर्षी आमच्याकडे पाऊस फिरकलाच नाही
सदरहू आम्ही यंदाचे पीक आसवांवरच घेतले

शेवटी काय म्हणता येईल तर "आपल्या' शब्दातून विचारांची काही मांडणी करणे - जी कधी लयीत असते तर कधी थेट असते.
आपल्या मूडवर सगळे अवलंबून आहे (असे माझे मत)- कधी दिवसभर शास्त्रीय संगीत आठवते तर कधी दिवसभर सिनेमातली गाणी - कधी कुठला मूड लागेल सांगता येत नाही.

पण खरी कविता आत कुठेतरी भिडते हे नक्कीच - ती र ला ट जोडून केलेली नसते. आणि अतिशय सुंदर कवितेच्या एखादा अरसिक रुक्ष समीक्षणाने चिंध्याही करु शकतो हे ही खरेच ....

फारच पाल्हाळ लावतोय का रे मी ??

shashaank

माझे एक मित्र श्री उल्हास भिडे यांची एक रचना मला इथे शेअर करावीशी वाटते -

जन्म कवितेचा
UlhasBhide | 16 July, 2010 - 19:32
जन्म कवितेचा

ये नच कविता कधि आमंत्रुन
येते कधि ना करुणा भाकुन
अनुभव, घटना मनास स्पर्शुन
जाती दुखवुन, कधी सुखावुन
विचार काहुर मनात दाटुन
जलदापरि ये मन ओथंबुन
शब्द, भावना संगम होउन
आशय बरसे काव्यघनातुन ......... १

ये नच कविता कधिही कळवुन
दार कुणाचे ना ठोठावुन
मनी जन्मुनी, येई आतुन
कवच मनाचे अवचित भेदुन
भाव मनीचे मनास लंघुन
निर्झरापरी झुळझुळ वाहुन
झर झर झरती ते झरणीतुन
आणि उतरती कविता होउन ...... २

ये नच कविता कधि हातातुन
सृजन तिचे हो मनगाभ्यातुन
विचार दर्या उधाण येउन
भाव उर्मी त्या उठती उसळुन
येति तटी अन् जाती विखरुन
शब्दांची ती रत्ने सांडुन
त्या शब्दांच्या पल्याड जाउन
भाव बोलती कविता होउन ........ ३

......... उल्हास भिडे १६-७-२०१०

मिलिंद कुंभारे

छान......
म्हणजे आत्ता पर्यंत मी मुक्तछन्दातच जगत होतो वाटतंय ...
पण शशांक.... वृत, अलंकार, मात्रा ह्याचबरोबर भावनांना हि महत्त्व असायला हवे ...
जसे म्हणायचे तर हल्लीचे नवीन कवी ज्यांना कवितेचा/भाषेचा फारसा अभ्यास नसतो , असंच काहीतरी लिहितात पण त्यात काहीतरी भावार्थ असतोच कि ....  :)

shashaank

याला उत्तर म्हणजे श्री भिडे यांची कविताच म्हणता येईल.

असे बघ, लहानपणी आपण जी बालगाणी, बडबडगीते शिकलो ती लयीमुळे जास्त आवडत होती.
म्हणून मोठेपणी फक्त लयीतील कविता या कविता नाहीत हे लक्षात आलेच ना ?
तसेच कधी कधी थेट अभिव्यक्ति ही अंगावर येणारीही असू शकते पण संयत अभिव्यक्तिही किती चटकन मनाला स्पर्श करुन जाते....
(उदा. स्पर्श या सिनेमातील नसिरुद्दिनचा अभिनय वा आंधीतील तेरे बिना जिंदगीसे कोई सिकवा या गाण्यामधील संजीवकुमारचा अभिनय)

कसं आहे ना एखादा फार जोराने आरडाओरडा करुन रडला तर त्याचे दु:ख जास्त असा काही नियम नाही ना - तसेच काहीसे.

पण माझे मत असेच आहे की कविता वाचताना मी कोणत्या मूडमधे आहे हे फार महत्वाचे आहे.
फार लांबलचक कविता असेल तर आपण नीट वाचतच नाही.
पण छोटीशीच असेल पण कवितेमधे काही दम नसेल तर तेही आपल्या लक्षात येतेच की ....

मला वाटतं ही न संपणारी चर्चा आहे.... तरीही तुझे मत जाणून घ्यायला आवडेलच मला ...

मिलिंद कुंभारे

शशांक,
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे अलंकार, छन्द, मात्रा, वृत्त ह्यामध्ये अडकलेल्या कविता मला कमीच समजायला येतात, त्यातला भावार्थ/अर्थ कळायला मला ती कविता किमान २-३ दा तरी वाचावी लागते .... तरीही त्यात काही ओळींचा अर्थ उमगतच नाही .... आणि त्यात कधी कधी कवितेला लय यावी किंवा यमक जुळावे ह्याकरिता काही शब्दांचा कणाच  मोडलेला दिसतो ... पण जसे तुम्ही अष्टाक्षरी ह्यासारखे फार्म सांगितले त्यात सोप्याच शब्दांत सर्वसामान्याना समजेल, उमजेल अशा कविता नक्कीच लिहू शकतो .... बाकी ते वृत्त, मात्रा सांभाळून कविता करणे थोडे कठीणच वाटते ....

आंधीतील तेरे बिना जिंदगीसे कोई सिकवा ...... हे गाणे लयबद्ध आहे काय ??? माझे ते फारच आवडते आहे ....
कधी tv वर तो चित्रपट आला तर मी पाहायचा सोडत नाही फक्त त्या गाण्यासाठीच ....
बाकी आपल्याशी ह्याविषयावर चर्चा करण्यात मजा आली ....  :) :) :)

sweetsunita66

अरे बापरे !येवढ कठीण असते कविता लिहिणं ,या पुढे मी जे काही लिहीन  ते पोस्ट नाही करणार ,कारण मला तर मात्रा ,यमक, छंद हे काहीच माहित नाही ,आत्तापर्यंत मी काय लिहिलं ,ते काय होतं, मलाच कळत नाही . तुम्ही दोघं मात्र बरेच गम्भीर दिसता कवितांच्या लिखाणाच्या बाबतीत ,असो ... आवडला  तुमचा संवाद !! :) :)

shashaank

हे कमॉन सुनीता - एवढे काही सिरीयस होऊ नकोस. कविता खूप सोप्पी असते, तशीच खूप अवघडही असते. आपल्याला अपिल होते ती कविता.
मलाही कुठे हे छंद, वृत्त, मात्रा माहितीएत - म्हणून तर मी बालकविता जास्त लिहितो - ज्यात फक्त एंटरटेनमेण्टच असते.
आता ही कविता बघ - सध्याचा खूप आघाडीचा कवि, गीतकार आहे - पण ही हलकी फुलकी पण अपिल होणारी कविता कशी सुरेख लिहून गेलाय....



बाकी काही नाही ..........    (सुप्रसिद्ध कविवर्य श्री. वैभव जोशी)

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

रस्त्यामधे दिसतातच की चेहरे येता जाता
"एका"सारखे दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून एसेमेस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही......