"नारायण, नारायण".

Started by shashaank, November 27, 2013, 03:38:33 PM

Previous topic - Next topic

shashaank

"पहाट झाली, उठा स्वामी हो
पूर्व दिशा उजळली "

पहाटेच्याही आधी अति शांत वातावरणात ते भूपाळीचे सूर असे तरंगत होते की जणू त्या गौतमी नदीवरील रेशमी धुकेच.

१९८३ चा जाने - फेब्रु. महिना,  स्थळ - पावसचे स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर.

स्वामी स्वरुपानंदांच्या समाधीच्या दर्शनाला आलेला आम्हा साताठ मित्रांचा एक ग्रूप.

उजाडायच्याही एवढ्या आधीच कोण इतकं मधुर आणि भावभरलं गातंय हे पहात मी मंदिरात केव्हा शिरलो माझे मलाच कळले नाही.

आत समाधीपाशी एक मध्यम उंचीची, कृश व्यक्ति उभी होती. हीच व्यक्ति त्या शब्दांशी, त्यातील भावाशी एकरुप होत ही भूपाळी आळवीत होती. प्रौढशा त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावर एक शांत, समाधानी पण जरासे निरागस असे भाव होते.
वातावरणात गारवा भरुन राहिलेला असतानाही त्या व्यक्तिच्या अंगावर लपेटलेले एक साधे खादीचे उपरणेवजा वस्त्र व खाली गुडघ्यापर्यंत नेसलेले एक धोतर एवढेच काय ते होते.

अतिशय अलगदपणे समाधीवरील वस्त्रे ती व्यक्ति उतरवत होती - न जाणो ती वस्त्रे उतरवताना स्वामींची निद्रा मोडेल की काय अशी काळजी घेत जणू !
मग हळुहळू समाधीच्या आसपासचा भाग स्वच्छ करण्यात ती व्यक्ति दंग झाली.

नंतर आसपास चौकशी करताना कळले की हे श्री. वैकुंठराव उर्फ मामा पडवळ - खुद्द स्वामी स्वरुपानंदांनी अनुग्रहीत केलेला भाग्यवान महात्मा.

मामांच्या हालचाली न्याहाळताना लक्षात आले की यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक हळुवारपणा व्यापून आहे, कुठेही धसमुसळेपणाचा लवलेश नाही - ते मग फुले वेचण्याचे काम असो वा मंदिर साफसफाईचे वा अजून काही.
आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुखात वसलेले "नारायण, नारायण" - ते ऐकताना नाम'स्मरण' शब्दाचा अर्थ जणू जिवंत होत होता - अगदी श्वासोच्छ्वासाइतके सहज होतं ते. कामापुरतेच मामा बोलत, एरव्ही नारायण नारायण. बाकी ना काही चर्चा ना काही संवाद. स्वामीप्रेमात दंग होउन राहिले होते ते पुरेपूर.

मला व इतर काही मित्रांना मग छंदच लागला - मामांच्या हालचाली न्याहाळण्याचा, त्यांच्या सर्व कृती निरखण्याचा.

समाधीची सकाळची पूजा चालू होती.
मामा अलगदपणे समाधीवरचे निर्माल्य उतरवत होते. त्यानंतर ओलसर पंचाने ते गंध टिपत होते -  असे वाटत होते की त्यांच्या दृष्टीला समोरची समाधी जाउन प्रत्यक्ष स्वामीच दिसत होते. स्वामींच्या सुकोमल शरीराला चुकूनही काही इजा होऊ नये अशी काळजी जणू ते घेत होते.
आम्ही काहीजण आसपास उभे असलेले पाहून त्यांनी नुसत्या हातानेच आम्हाला खाली बसण्याची खूण केली. तो पूजाविधी आम्ही सगळे मनात साठवतोय हे त्यांच्या लक्षात आलं असावं कारण त्या समाधीवरील गंधाच्या गोळ्या व फुल-तुळस (निर्माल्य) हे सगळं त्यांनी तशाच हळुवारपणे आमच्या प्रत्येकाच्या हातावर ठेवलं - अगदी सहजपणे, निर्हेतुकवृत्तीने. आम्ही सगळे पूर्ण नि:स्तब्ध.

मग यथासांग पूजेचे विधी सुरु झाले -
जलप्रक्षालन,
दुग्धस्नान,
पुन्हा जलप्रक्षालन,
पंचामृतस्नान, पुन्हा जलप्रक्षालन.
हे करत असताना त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे पुरुषसूक्ताचे स्वर. असे काही भक्तिमय वातावरण तयार झाले होते की सगळे कालचक्र इथेच थांबून रहावे - निदान काहीकाळ तरी.

समाधीवरील तीर्थ डोळ्यांना लावणे, मग कोरड्या वस्त्राने समाधी टिपणे,
मग गंधलेपन - अति मृदूतेने हे सगळं चाललं होतं -
"का कमळावरी भ्रमर | पाय ठेवीती हळुवार | कुचुंबैल केसर | इया शंका|" ही माऊलींची ओवी मूर्तस्वरुपात साकारत होती जणू.

मग पुढे फुले, तुळस अर्पण करताना त्यांची सहज सुंदर आरास साकारली जात होती - अशी की कोण्या उत्तम चित्रकाराने सहज फुलांची रांगोळीच मांडावी - अतिसुबकपणे.
आणि मग तो नैवेद्य दाखवणे - नव्हे, नव्हे - आईच्या हाताने स्वामींना घास भरवणे.
डोळे नकळत केव्हा गळू लागले व केव्हा मिटले गेले हे माझे मलाच कळले नाही.
.
.
एकदम आरतीच्या घंटानादानेच जाग आली - जणू आतापर्यंत जमून आलेल्या त्या परम शांतीचा भंग कोणी व्रात्य पोरं करताहेत असं वाटू लागलं, कवायतीसारखी आरती करतो आहे मी असं वाटू लागलं.

दुपारी जेवण/प्रसाद घेतानाही मामा आवर्जून आम्हा सर्वांच्या जवळ येउन "सावकाश जेवा, काय हवं अजून" असं मृदू आवाजात विचारत होते - जोडीला "नारायण"स्मरण तर चालूच -

कुठल्या मुशीतून भगवंताने यांना घडवले आहे असा विचार मनात दाटत होता.

माझ्या स्वामीजींच्या घरी आवर्जून आलेली ही सर्व मंडळी म्हणजे निस्सिम स्वामीभक्तच, माझे भाऊ-बहीणच - मग त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळतंय ना हे मी पहायला नको का असाच विचार त्यांच्या ठायी असणार - त्यामुळे हे सगळे पहाण्यातच ते गुंग होते. त्या जेवणाच्या गदारोळात मामांना जेवताना शेवटपर्यंत पाहिलंच नाही मी तरी.

"सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा" - असे वर्णन आतापर्यंत फक्त ऐकले होते त्या सर्वोत्तमाच्या दासाचे - त्याचे असे प्रत्यक्ष दर्शन घडेल असे कधी वाटलेच नव्हते.

त्यांच्या विषयी आसपासच्या मंडळींकडून जाणून घेताना फक्त आश्चर्य व आदरभावच दुणावत होता मनात.

तसं पहाता, स्वामी स्वरुपानंद हे सोऽहं ची दीक्षा देणारे सत्पुरुष. पण गंमत अशी सांगतात की जेव्हा स्वामींनी मामांना सोऽहं ची दीक्षा दिली तेव्हा पुढे हे ही सांगितले लगेचच की - त्या "नारायणाला" सोडायचं नाही हं! - असे भाग्यवान हे मामा.

मामा वेंगुर्ल्याला रहात पण सहा महिने पावसलाच मुक्काम असे. वेंगुर्ल्याहून एकटेच खांद्यावर पताका घेऊन पायी पायी पावसची वारी करत येत असत - मुखात "नारायणाच्या" जोडीला स्वामींचे अभंग. हे ऐकल्यानंतर ते काय उद्योगधंदा करतात अन त्यांना मुलबाळं किती असले काही प्रश्नच मग उद्भवले नाहीत मनात. स्वामीप्रेमाने पुष्ट झालेला हा महात्मा ज्ञानेश्वरी, दासबोधात सांगितलेली सगुणभक्ति प्रत्यक्ष आचरत होता.
मामांचे जगच निराळे होते. केवळ भगवंताच्या व स्वामीजींच्या भरंवशावर - एका वेगळ्याच मस्तीत ते वावरत होते. व्यावहारिक जगात ज्या परमात्मभावाला काडीचीही किंमत नसते त्या भावाला अंतरात प्राणापलिकडे जपत ते एक अलौकिक भावजीवन जगत होते - पण ते ही अगदी सहजपणे, त्याचा देखावा न करता, त्याचा दंभ होऊ न देता.

- परममहंसपदी आरुढ झालेले स्वामी स्वरुपानंद - जे आता चैतन्यमय अवस्थेत तिथे वास्तव्य करुन होते ते आम्हा  शहरी, तार्किक व बुद्धिमानी (?) व्यक्तिंना सगुणभक्ति कशी करावी हा जणू पाठच देत होते या महात्म्याकरवी.

संध्याकाळी पुन्हा आरती निमित्ताने मंदिरात जाणे झाले. सकाळच्या त्या भावभरल्या आठवणी मनात साठवताना मी जरा बाहेरच थांबलो मग! आरतीचा गदारोळ पुन्हा सगळ्या शांतीचा भंग करेल की काय या भितीने !

रात्री जेवणानंतर शतपावली करायला आम्ही काहीजण बाहेर पडलो, तर मामा मंदिरात जाताना दिसले - कुतुहलाने आम्हीही त्यांच्या पाठोपाठ.

पुढचे जे दृश्य मी पाहिले ते माझ्या ह्रदयावर असे काही कोरले गेले आहे की मी ते आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही -

समाधीच्या लगेचच मागील भिंतीवरील एका कोनाड्यात श्री विठ्ठल - रखुमाईच्या उभ्या मूर्ती आहेत - छोट्याशा.
मामा त्या मूर्तींचे दर्शन घेऊन चक्क त्यांचे पाय दाबून देत होते - जसे आपण एखाद्या जिवंत माणसाचे दाबून देतो तस्से - अगदी आपुलकीने, प्रेमाने. - आणि मामांच्या डोळ्यात असे आर्त भाव की - देवा, किती असे तिष्ठत उभे रहाता आम्हा क्षुद्र जीवांसाठी ? जरा विसावा घ्यावा ना आता.
माझी संपूर्ण खात्री आहे की - हे पहायला कितीही नास्तिक, शंकेखोर माणूस जरी तिथे उपस्थित असता तर - त्यानेही लोटांगणच घातले असते - त्या विठ्ठलाला आणि या महाभागवतालाही.

लौकिक-भौतिक गोष्टीत लडबडलेल्या या विसाव्या शतकात एवढे मोठे आश्चर्य माझ्यासमोर घडत होते की क्षणभर आपण याच युगात आहोत ना की चुकुन कुठल्या सत्ययुगात वगैरे पोहोचलो की काय हे कळेना झाले.

आम्ही तिथे असूनही मामा त्यांच्या पादसेवनभक्तित दंग होते - ना तिथे कुठली कृत्रिमता ना काही विशेष आविर्भाव. हे नक्कीच त्यांचे दररोजचे, नित्याचेच भक्तिकर्म असणार.

हे देवदुर्लभ दृश्य पाहताना आम्ही सगळे जागीच खिळल्यासारखे व आता पुढचा काय चमत्कार पहायला मिळणार या उत्सुकतेत.

मामा शांतपणे समाधीशेजारी बसले, मुखात स्वामींचेच भावभरले अभंग.
समाधीवरील सगळ्यात वरची फुले (निर्माल्य) हळुवारपणे उचलून त्यांनी बाजूला ठेवली व अतिशय प्रेमाने थोपटल्यासारखा असा हात समाधीवर फिरवत राहिले. मगाशी प्रत्यक्ष भगवंताचे पदकमल चुरुन देणारे मामा आता स्वामीजींसारख्या महापुरुषाची जणू मायमाऊली होऊन जणू त्यांना अंगाई गात, थोपटून जोजवत होते ...... या सर्व चमत्कारांपुढे वाणी, मन जणू संपून गेल्यासारखे झाले होते. फक्त एक आर्तता, व्याकुळता मनात भरून राहिली.....
मग त्याचाच परिपाक म्हणून की काय....
माझ्या अंतःकरणातला दगड फुटून जणू पाझरायला लागला होता - डोळे मिटून शांतपणे मी खाली बसलो आणि ते अभंग आत साठवत राहिलो - किती काळ गेला कोण जाणे.
मित्रांनी खांद्यावर अलगद हात ठेवत जागे केले.
अर्धवट जागा, अर्धवट ग्लानीत बाहेर पडताना मी पाहिले - समाधीवरील उबदार पांघरुण मामा सारखे करत होते.

स्वामी स्वरुपानंदांच्या कृपेनेच ही यात्रा अशी "सुफलित" होणार होती तर.
.
.
पुढे बर्‍याच वर्षांनी म्हणजे २०११मधे पावसला जाण्याचा योग आला. मंदिरात शिरण्यापूर्वी सहज लक्ष गेले - मंदिराच्या पहिल्याच पायरीवर, एका कोपर्‍यात एक पितळी पत्रा लावलेला - त्यावर काही मजकूर व एक दोन फुले वाहिलेली.
कुतुहलाने मी जवळ जाऊन निरखून पाहिले तर - "स्वामी कृपांकित वैकुंठराव पडवळ" असा नामनिर्देश पाहून तिथेच गुडघ्यावर बसलो. त्या पाटीवरुन हात फिरवताना कानात गुंजत राहिले ते भावभरले "नारायण, नारायण".

माझ्या मनात आलं - "या इथेच, श्री स्वामींच्या चरणांपाशीच सदैव रहायला  आवडेल मला - स्वर्गसुख तर नकोच, पण ते अतिदुर्लभ वैकुंठसुखही नको मला." याशिवाय या महात्म्याची दुसरी इच्छा तरी काय असणार ?
स्वामीप्रेमात अखंड डुंबणारा हा अतिप्रेमळ महात्मा काय अन् विठ्ठलप्रेमाने वेडे झालेले ते श्री नामदेवराय काय ? - दोघांची जातकुळी एकच की.

"नारायण, नारायण".....
...........................................................


-shashaank purandare.