असा कसा तू?

Started by Omkarpb, December 04, 2013, 08:10:57 PM

Previous topic - Next topic

Omkarpb

जेव्हा मी एकटा असतो,
म्हणजे जेव्हा मीच माझा श्रोता असतो,
तेव्हा विचारांच्या रिंगणामध्ये मी अडकला जातो,
त्यावेळी एखादी कुठलीशी जुनी
ओळखीची माझीच जखम मला विचारते ,

" असा कसा माणूस आहेस तू?
मी एवढी जिवंत असताना ,
हास्याला कसा ठेवून घेऊ शकतोस तू?
एवढा आनंदी कसा राहू शकतोस तू?

मी एकटी अजिबात नाही
अनेक जणींची साथ मला
त्यांच्याकडे फक्त "पाहणे"
हा एकच उपचार कसा असू शकतो?

तुला लागलेल्या प्रत्येक ठेचेचा
हिशोब तुझ्याकडे नक्कीच आहे,
तुला मिळालेल्या प्रत्येक घावेचा क्षण
तू नक्कीच जपून ठेवला आहेस.

मग का असं गांधारी होणं ?
का गांधीजींचे तीन माकडं होणं ?
का अशी खोटी सोंगं घेणं ?
का आपल्या जाणिवांना कडीकुलपात ठेवणं?

मी केवळ बाहेर नाही
मी तुझ्या हृदयात ,
तुझ्या नसानसांत ,
मी तुझ्या प्रत्येक हालचालीत , प्रत्येक शब्दात!

पण नाही मी तुझ्या तक्रारीत,
नाही मी तुझ्या अश्रूत ,
ना मी कोणत्या वेदनेचा भाग,
ना मला सहानुभूतीची साथ.

माझ्या वेदनेला एकदातरी हुंकार दे,
त्यांच्यासाठी निदान डोळे पाणावू दे,
माझ्यातून भळभळणाऱ्या पोरक्या रक्ताला,
एकदातरी छत्रछाया दे ....... "

ह्या जखमेच्या प्रश्नावर
मी पुन्हा एकदा तसाच हसतो,
पण लगेच गंभीर होतो,
आणि तिला उत्तर देतो,

" मी तुमच्याकडे पाहून हसतो,
कारण असं म्हणतात,
रडल्याने मन हलकं होतं ,
नाही हलकं व्हायचं मला ,
ना मला तुम्हाला विसरायचं ,
तुम्हाला बांधून ठेवायचंय ,
सतत आठवत रहायचंय ,
त्या वेदनेचा क्षण न क्षण ताजा ठेवायचाय ,
कारण जखमी माणसाला अजून जखम झाली,
तरीही तो जखमीच राहतो
आधीच वेदनांचं भांडार असताना,
नव्या वेदनेचं कौतुक कुणालाही नसतं,
आणि फक्त एक जाणीव असते,
शर्यत पूर्ण करताना आपण ज्या काट्यावरून चाललो,
त्यांच्या वेदनांचे अंगारे सदैव माझ्या अंगात फुलू देत,
आणि ती शर्यत पूर्ण करण्यासाठी
सदैव उर्जा वाहू देत................... "


-ओंकार