प्रेमात पडलेला म्हातारा ..

Started by विक्रांत, June 17, 2014, 09:50:11 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

(ही विनोदी कविता नाही. सिरिअस प्रेम कविता आहे  )

एकदा एक म्हातारा
चक्क प्रेमात पडला
बायको पोरं सोडून
तिच्या नादास लागला

रंग लावून केसाला
झाडून दाढी मिशीला
तंग रंगीत कपडे
नवीन घालू लागला

चालतांना स्वत:शीच
गिरकी घेवू लागला
पडता पडता खाली
तोल सावरू लागला

मग एकदा मुद्दाम
मीच त्याला गाठले
त्याला बहकण्याचे
कारणही विचारले

काहीसा अडखळला
मग जरासा खुलला
पाठीवरती जोराने
थाप मारत बोलला

सांग बरे प्रेम काय
करू नये म्हाताऱ्याने
भिजुनिया रंग पुन्हा
खेळू नये जीवनाने

जिथे प्रेम मिळे तिथे
मन सदा धाव घेते
विझलेल्या मनामध्ये
काय कधी गीत येते

प्रेमाहून जगामध्ये
काही सुंदर नसते
देवधर्म गुरुपूजा
सारे नाटक असते

ज्या घरात प्रेम नाही
तिथे काय जगायचे
जगासाठी पाठीवरी
ढोर ओझे वाहायचे

बघ माझे चार दिन
राहिलेत राहू देत
घर दार जग सारे
शिव्या शाप देवू देत

ज्याला त्याला ठरलेला
स्वार्थी हिशोब असतो
त्यांचा जरा चुकलाच   
माझा जरा जमवितो

सुदैवाने भेटली ती 
अथवा नाही पटली
तिच्यामुळे मित्रा पण 
माझी जिंदगी सजली

विक्रांत प्रभाकर