एक प्रतिक्षा ना सरणारी

Started by madhura, July 29, 2014, 10:27:56 AM

Previous topic - Next topic

madhura

शोध घ्यायच्या अधीच थकली
नजर बिचारी भिरभिरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

प्रीत काय हे कळण्याआधी
तिची जिवाला ओढ लागली
दंगा, मस्ती शाळेमध्ये
सहवासाची जोड लाभली
मनात रुजली हलके हलके
एक भावना शिरशिरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

काय हवे मज तिच्यापासुनी
मला कधी ना कळले होते
कधी भेटता, तिच्या दिशेने
डोळे हटकुन वळले होते
निमंत्रणाविन अजून येते
तिची आठवण दरवळणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

एक कोपरा तिने व्यापला
अंतरातला खास मखमली
सदा नांदते बहार तेथे
रूप खुलविते तिचे मलमली
वादळातही मनी तेवते
मंद ज्योत ती थरथरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

बघता बघता शाळा सरली
मार्ग आपले किती बदलले !
मला उशीरा कळून आले
जपावयाचे तेच हरवले
कायमची ही खंत मनाला
सांजसकाळी कुरतडणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

अंतक्षणीही आयुष्याच्या
एक अधूरे स्वप्न असावे
एकच नाते, पोत रेशमी
काच जिवाला, तरी हसावे
नको पिंड, मज हवी शिदोरी
अंतःकरणी मोहरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

निशिकांत देशपांडे