सुनो दिल की आवाज

Started by MK ADMIN, November 05, 2009, 04:14:31 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

Post Your comments....thanks to सचिन परब  
वेगवेगळे हसणारे कितीतरी. निरनिराळं हसू. बघता बघता आपल्यालाही हसू आवरत नाही. हसण्यामागच्या जजबात ऐकायच्या असतील
, तर सुनो दिल की आवाज. टाटा इंडिकॉमची नवी जाहिरात सांगते.

सुनो दिल की आवाज, असं टाटा इंडिकॉम गेली अनेक वर्षं सांगतंय. छान छान अॅडमधून. सेपिया टोन मधली तुकड्यातुकड्यांतली एक अॅड. मागे धीरगंभीर आवाज, 'मैं मेहबूब खां पठाण. मैं आज उन दो बच्चों के बारे में बताऊंगा जो कभी किसीकी बात नहीं सुनते थे...' त्यांनी आम्ही कधीच ऐकला नव्हता, तो आवाज ऐकला, मनाचा आवाज. असं ऐकताना इरफान आणि युसूफ पठान दिसतात.

काही अॅड सक्सेस स्टोरी सांगणाऱ्या. आतला आवाज ऐकून यश मिळवलं, असं सांगणारे करण जोहर, प्राची देसाई, ललित मोदी किंवा हिमेश रेशमियाही. नाकात गाणारा हिमेश कितीही डोक्यात जाणारा असला. तरी अॅडमधलं त्याचं डोक्यात पक्कं बसणारं वाक्य, दिल की आवाज सुननेवालों को कोई अनसूना नहीं कर सकता.

पण या सगळ्या अॅडपेक्षाही लक्षात राहणारी अॅड ती एका छोट्याशा शहरात पहाटे उठून धावण्याची प्रॅक्टिस करणाऱ्या मुलीची. त्या अॅडच्या सुरुवातीलाच एक सवाल होता, क्यां ये नॅरो माइंडेड गलियां कभी खत्म नहीं होती? एकदम झकास वाक्य. गजलेचा शेर वाटणारं.

आवाज. हिंदीत स्त्रीलिंगी. मराठीत पुलिंगी. इंग्रजीत नपुंसकलिंगी. पण आवाज तो आवाजच. सगळं वाहून नेणारा तरीही सगळ्याच्या पार असलेला. आपल्या भावना व्यक्त करणारं ते माध्यम. पण भावना असतानसतानाही खूप काही असतं आवाजात. आवाज आपल्याला धीर देतात. अस्वस्थ करतात. नवा जन्म देतात. संपवूनही टाकू शकतात. म्हणूनच आवाजाला नाद म्हणत असावेत. नादावून टाकणारा तो आवाज.

आवाजाचं गूज शोधताना भंडावून जायला होतं. गुंगून जातो आपण. कान आणि मन उघडं असेल तर फक्त आवाजच नाही तर आवाजातलं खूप काही ऐकता येतं. तेच आवाज संगीत बनून अनेकांचं जीवन व्यापून टाकतात. काहींना त्यात नादब्रह्मा ऐकू येतो. विश्वाची उत्पत्ती आवाजतच झाली, असा विश्वास असणारी ही अनुभूती. मग आवाजातला कलकलाट नाही ऐकू येत. त्याच्या फार फार पुढची एक अनिवार शांतता ऐकू येत राहते. सतत निरंतर शांतता.

पण 'आतला आवाज' आणि 'दिल की आवाज' या सगळ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. सर्वच अर्थांनी मोठा. आपण बाहेरचे आवाज ऐकताना कधीच बधीर झालोय. त्यामुळे आतला आवाज नाही ऐकू येत आपल्याला. आपणच त्याला बाहेर पडू देत नाही. कारण सोपं नसतं तो ऐकणं. आपल्यातल्या आपली ही हाक असते. अंतिम सत्याला भेट देणारी साद. आपली आपल्याला ओळख करून देते ती.

आपण तो आवाज ऐकला, तर तो आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. पण तो आचरणात आणणं सोपं कधीच नसतं. व्यवहार त्याच्या विरुद्ध सांगत असतो. आपले हितचिंतक मार्गदर्शक त्यातली रिस्क आपल्याला दाखवत असतात. कोणतीच गणितं, कोणताच तर्क त्याचं समर्थन नाही करू शकत. त्यातून आपलं नाकासमोर चालणारं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. कारण आतला आवाज दाबूनच आतापर्यंतचं विश्व उभं केलेलं असतं आपण.

तरीही ऐकायलाच हवा 'दिल'चा आवाज. कारण तो 'दिल'चा आवाज आहे.

- सचिन परब

gaurig

mastach......