कुत्री निवडतात नेता! - On Politics

Started by tanu, November 05, 2009, 04:24:47 PM

Previous topic - Next topic

tanu

Source: Email by friend


फार फार वर्षांपूवीर्ची गोष्ट आहे. एकदा कुत्र्यांनीही आपला नेता निवडण्याचे ठरविले. मग त्यासाठी सर्व जातीजमातीच्या तमाम सगळ्या कुत्र्यांचे महाअधिवेशन बोलविण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे ती श्वानांची महासभा भरली. नेतानिवडीचे रीतसर काम चालू झाले. वेगवेगळ्या सूचना वेगवेगळ्या स्वरांत मांडल्या जाऊ लागल्या. त्यात एकजण उठून म्हणाला, ''मी बुलडॉगला आपल्या सर्वांचा नेता म्हणून निवडण्याचा प्रस्ताव आपल्यापुढे ठेवतो. तो शक्तिशाली तर आहेच, पण अतिशय कडवेपणाने लढूही शकतो.''

त्याचे बोलणे संपते न संपते तोच दुसरा एक कुत्रा उठून भुंकला, ''पण तो वेगात पळू शकत नाही. जो लढू शकतो-पण पळू शकत नाही, असला नेता काय कामाचा? तो तर कुणालाच पकडू शकणार नाही.'' तेवढ्यात आणखी एक कुत्रा उभा राहिला व म्हणू लागला, ''मित्रहो, मी ग्रेहाऊंडचे नाव सुचवू इच्छितो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. तो तर अतिशय वेगाने पळू शकतो.''

काही क्षणांच्या नि:शब्द शांततेनंतर दोनचार कुत्सित बु:भु:क्कार हलक्या आवाजात ऐकू आले; व नंतर एक मोठा गट असहमतीच्या स्वरात भुंकू लागला, ''हे शक्य नाही! त्याला नुसतेच पळता येते; पण तो कसला लढणार शत्रूशी!''

एक जण मोठ्याने भुंकला, ''पळून पळून समजा त्याने जर कुणाला पकडलेच, तरी काय उपयोग? उलट तोच कुत्र्यासारखा मार खाईल!' सभेत थोडा वेळ गोंधळ माजला. तेवढ्यात एक मरतुकडा कुत्रा उभा राहिला, व म्हणाला, ''मी माझ्या अगदी समोर असणाऱ्या कुत्र्याचे नाव नेतेपदासाठी सुचवतो. त्याच्या शेपटीच्या खालच्या भागातून मस्त सुगंध येतो आहे.'' दोन तीन हुंगण्याचे श्वासउच्छ्वास ऐकू आले. एवढ्यात आणखीन एक घाणेरडा, अशक्त, खरजुडा कुत्रा पळत पळत पुढे आला व केकाटला, ''मी या पस्तावाशी सहमत आहे! वास छानच आहे! असाच निर्णय घ्यावा!!''

बघता बघता महासभेतले सगळेच कुत्रे एकमेकांच्या शेपटीखालच्या भागात नाक घालून वास घेऊ लागले, जोरजोरात भुुंकू लागले. सगळ्यांचा आरडाओरडा चालू झाला. सगळीकडून वेगवेगळे आवाज येऊ लागले.

''फूं! फूं! याचा वास बिल्कूल चांगला नाही.''

''याचा तर अजिबातच नाही!''

''छे! छे! याला काय चांगला वास म्हणायचे की काय?''

''हा कसला नेता? याला तर वासच येत नाही!''

''हा सडका, घाणेरड्या (!) वासाचा तर माझा उमेदवार नेता होऊच शकत नाही!''

''छी! छी! फूं! फूं! भो! भो!!''

असे अनेक प्रकारचे अनेक आवाज; केकाटणे, खर्जातले- रडव्या सुरातले- गुरगुरण्यातले- मोठ्या आवाजातले ओरडणे ऐकू येऊ लागले. महासभेतले सगळेच तीव्र स्वरात व सुरात भुंकू लागले. अर्थातच हा प्रचंड आरडाओरडा-गोंगाट थोडा वेळ चालल्यानंतर सभेचे कामकाज बेमुदत तहकूब झाले.

मित्रहो, आजही जर आपण एका ठिकाणी गोळा झालेल्या कुत्र्यांकडे लक्षपूर्वक पाहिलेत तर तुमच्या ध्यानात येईल की कुत्री आजसुद्धा आपला नेता निवडण्याच्या खटपटीत आहेतच. पण आजतागायत त्यांना यश आलेले दिसत नाही. हुंगण्याचा सर्व खटाटोप व्यर्थच! येईल त्यांना यश?

('एवां बुलाओ'च्या सिऊ लोककथेचा स्वैर मराठी अनुवाद)