॥ माझ्या मरणाचा पंचनामा ॥

Started by Rajesh khakre, November 26, 2014, 11:36:12 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

॥ माझ्या मरणाचा पंचनामा ॥

केली आत्महत्या
एकदाची देवा
सुख लागु दे रे
कुटूंबा माझ्या ॥

गे काळी आई
माफ कर मला
करत होतो सेवा
रात्रंदिन ॥

तुझ्याच कुशीत
फुलत होते शेत
सर्व ही मजेत
आनंदात ॥

कुणा वाईटाची
लागली नजर
झालासे कहर
जीवनाचा ॥

वरुण तो राजा
नाही बरसला
कोपली ती माय
पाण्याविन ॥

करपली पीक
करपले मन
करपली चूल
अन्नाविन ॥

कर्जाचा डोँगर
मुलगी उपवर
उपाशी जनावर
चार्याविन ॥

महागले खत
महाग बियाणं
औषधी महाग
फवारणीची

उत्पना त्या पेक्षा
खर्च झाला मोठा
गाडा आयुष्याचा
लोटू कैसा? ॥

मी गेल्यावरी
देतील नेते हाक
माझ्या मरणाचा भाव
दोन लाख ॥

येतील ते नेते
मिडिया सहीत
फोटो काढतील
माझ्या घरी ॥

पुन्हा आरडाओरड
विरोधीपक्ष करतील
विधानसभा विस्कळित
एक दिवस ॥

जगण्याची मज
होती देवा आस
जीव कासावीस
कसा ठेऊ? ॥

जगण्याची कैसी
वेगळी ही रीत
मी ही आचंबित
झालो देवा ॥

जगण्याची माझ्या
दखल नाही कुणा
मरणाचा माझ्या
पंचनामा ॥

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com