थोडा पाऊस

Started by madhura, December 13, 2014, 11:15:06 AM

Previous topic - Next topic

madhura

थोडा पाऊस पडतो तेव्हा अंगण सारे भिजते
वरती वरती ओली माती आत कोरडी असते
शुभ्र पांढरे मोती लेवून धरती क्षणभर सजते
मान झुकवल्या झाडांना पण काही चिंता नसते

गंध उसळतो खरपूस गारठलेल्या वार्‍यावरती
लटपटणारे थेंब पहूडती निवांत पानांवरती
पंख फ़डकवत झाडावरती पक्षी अनेक जमती
जागोजागी भिजलेल्यांच्या दिसती सार्‍या गमती

फ़ांद्यांवरती हुंदडणारी खार उतरते खाली
वारूळातूनी सरकत येते हळूच माती ओली
रानफ़ुलांच्या गालावरची वितळून जाते लाली
जमते फ़लटण सारी ज्यांची घरटी ओली झाली

कुठेतरी एखादे डबके दिसते गजबजलेले
सभोवताली अंघोळीला किटक बरबटलेले
चेंडू ढकलत शेणकिड्यांचे सैन्य असे थकलेले
दगडावरती भक्ष्य शोधण्या बगळेही बसलेले

पागोळ्यांची टपटप चालू जुनाट कौलांमधूनी
चिमण्या धावत येती तेथे निर्मळ पाणी बघूनी
मस्त रंगतो डाव झेलण्या पडणार्‍या थेंबांना
काही लपती अंग झटकण्या खिडक्यांमध्ये बसूनी

काही वेळानंतर वर्दळ वाटेवरती दिसते
धरती अपुले अंग सावळे पुन्हा उन्हाने पुसते
आकाशातील धुंद ढगांची चादरही विस्कटते
फ़िरून गेले ढग पुन्हा कि ओल उन्हाने सरते..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)