ऐसा महानगरीचा आवाका

Started by madhura, November 19, 2009, 09:54:56 AM

Previous topic - Next topic

madhura

हत्ती कसा आहे, ते सांगताना 'दोरीसारखा,' 'खांबासारखा,' 'सुपासारखा' अशी वर्णनं करणाऱ्यांसारखीच अवस्था होते मुंबई महानगरीचं वर्णन करणाऱ्यांची. ज्यांनी शहरातली धावपळ अनुभवली त्यांना मुंबई जाणवते ती उपनगरीय लोकल गाडय़ांमधून. गिरणगावातले तेजीचे दिवस अनुभवलेल्यांच्या तोंडून शहराच्या मध्यमवर्गीय सांस्कृतिक रुपाचं वर्णन ऐकायला मिळतं; सिनेक्षेत्रातल्या व्यक्तींना शहराच्या अर्थव्यवस्थेचं अंतरंग भुलवतं; तर भांडवलदारांच्या मुलांच्या नजरेत फक्त पंचतारांकित मुंबई तरळत असते. 'मुंबई' खऱ्या अर्थाने समजून घ्यायची तर यापैकी कुठलाही पैलू वगळून चालत नाही, उलट या सर्वाचं सुटं सुटं निरीक्षण करण्याऐवजी त्यांची एकमेकांशी संगती लावता आली तरच या महानगरीचं काही प्रमाणात आकलन होतं. 'अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट'नं जटिल शहराची रचना समजून घेण्यासाठी असाच प्रयत्न केला आहे. 'मुंबई रीडर ०६' हे हिंदी पुस्तक याच नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुंदर रचनेची मुंबई साकारण्याच्या स्वप्नापासून ते 'मुंबई' म्हणजे केवळ वस्ती आणि जमीन नव्हे, तर तिलाही 'पर्यावरण' आहे, याची जाणीव करून देणाऱ्या लेखापर्यंत मोठा आवाका पुस्तकाने घेतला आहे. मुंबईत घडलेले व्यावसायिक, शहरातल्या विविध सामाजिक संस्थांशी निगडित व्यक्ती तसंच शहरातल्या विविध घटकांचं जवळून निरीक्षण करणारे पत्रकार यांच्या सखोल अभ्यासातून यातले २२ लेख साकारले आहेत. यामागची संकल्पना स्पष्ट करताना इन्स्टिटय़ूट म्हणते, 'केवळ सपाट पृष्ठभाग म्हणून शहररचनेचं निरीक्षण हा मर्यादित परिघातला अभ्यास ठरतो. तर एखाद्या घटकाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती जवळून पाहून ज्याने विचार मांडले त्याचं लिखाण एकांगी होण्याची शक्यता असते. हे दोन्ही टाळत शहराचं गुंतागुंतीचं रूप उलगडावं, याचा हा प्रयत्न आहे.

संस्थेच्या आवाहनाला शक्य तितका न्याय देत, बीना बालकृष्णन,  श्याम चयनानी, डेरिल माँटे, पंकज जोशी, मीना मेनन, नीरा आडारकर, कल्पना शर्मा, प्रसाद शेट्टी, राहुल श्रीवास्तव, राहुल मेहरोत्रा आदी तज्ज्ञांनी आपलं लिखाण जास्तीत जास्त माहितीपूर्ण केलं आहे. 

मुंबईची आर्थिक प्रगती आंतरराष्ट्रीय दर्जाची करतानाच शहराच्या सर्वसामान्य माणसाचं राहणीमानही दर्जेदार करण्याबाबतचा मॅकेन्सी अहवाल हे पुस्तकातलं पहिलं प्रकरण. सध्या मुंबई आर्थिक प्रगती आणि राहणीमान या दोन्ही स्तरांवर पिछाडीला जात आहे; यातून मार्ग काढण्यासाठी काय काय करता येईल, ते अहवाल सांगतो आणि त्याकरिता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची मानसिक बैठक बदलली पाहिजे असा आग्रह धरतो.

मुंबईचं 'शहर' होणं, तिला वेग प्राप्त होणं, प्रगतीबरोबर नोकरदार वर्ग तयार होणं इथपासून वाहनांनी गजबजलेलं तिचं आजचं स्वरूप रेखाटलं आहे बीना बालकृष्णन यांनी. 'कम्युटिंग'ची जीवघेणी समस्या सोडवायची तर मुंबईतली वाहतूकव्यवस्था आमूलाग्र बदलली पाहिजे, त्यासाठी सुचवण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी निरपेक्षपणे झाली पाहिजे, असं आवाहन त्या करतात.

झगमगत्या मुंबईला घडविणारे हात आहेत ते गरिबांचे. स्वत: कमालीच्या गैरसोयींत राहून शहर सुशोभित करणाऱ्या या झोपडवासियांना गुंतवणुकीची संधी देणारेही शहरातच निघाले. वेगवेगळे सरकारी, स्वयंसेवी बचतगट मोठय़ा प्रमाणावर हे काम कसं करत आहेत, त्याची माहिती सांगितली आहे सुंदर बुर्रा व देविका महादेवन यांनी.

कापड गिरण्यांचा उद्योग, त्यानं घडवलेली आणि बिघडवलेली मुंबई हा शहराच्या इतिहासाचा मोठा आणि परिणामकारक भाग. त्याच्याच संदर्भाच्या आधारे वर्तमानही सांगितलं जातं. गिरणगावाचं सांस्कृतिक वातावरण, सामाजिक चळवळी, इथल्या मंचीय कलांचा विकास याविषयी मीना मेनन आणि नीरा आडारकर यांनी लिहिलं आहे. कॉ. मिरजकर, सुकोमल सेन, व्ही. बी. कुलकर्णी, मनोहर कदम आदींच्या ग्रंथांचा आणि निवृत्ती पवार, विजय खातूंसह अनेक गिरणी कामगार, कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा आधार त्याला आहे.
ट्रेड युनियन्स, गिरण्यांचे संप, नेत्यांच्या हत्या हेही मुंबईच्या इतिहासातलं प्रमुख पर्व. त्यावर 'आतापर्यंत न सांगितलेलं घटित' असं म्हणत डेरिल माँटे यांनी एक सविस्तर प्रकरण लिहिलं आहे.
शहररचनेची समस्या आणि त्यावर उपाय सुचवणारेही काही लेख आहेत. पण प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असून त्यांत पुनरुक्ती नाही. वास्तुशिल्पीच्या नजरेतून शहराचा विचार करण्यात आला आहे तर घरांची भाडेपट्टी, मालकी व त्या अनुषंगाने होणारे व्यवहार यांवरही दोन अभ्यासपूर्ण प्रकरणं आहेत.

पर्यावरण रक्षण म्हणजे 'झाडं लावणं' नव्हे, असं म्हणत सुरुवात करून प्रसाद शेट्टी या समस्येच्या कॉस्मेटिक स्वरूपाचं वाचकाच्या मनातलं जळमट बाजूला करण्यात यशस्वी झालेत. सर्वाना मानसिकव शारीरिक आरोग्य, उत्साह मिळावा यासाठी पर्यावरण चळवळ आहे, हे ते साध्या शैलीत सांगतात. याशिवाय काही प्रकरणांत एनजीओंचं कार्य दिलं आहे. यातले अहवाल अर्थातच सामाजिक घटकांविषयी बोलतात. एका प्रकरणात चौक, रस्त्यांना दिलेली नावं आणि त्यामागचं राजकारण विशद करण्यात आलं आहे. प्रीती चोपडा यांचा हा लेख रंजक आणि उत्कंठावर्धक आहे. 
पण सरतेशेवटी हा प्रयत्नच आहे, असं संपादक म्हणतात. हत्तीची सोंड पाहून तोंडात बोट घालणाऱ्यांना शेपूटही दाखवायचा, कान पाहणाऱ्यांचं लक्ष पोटाकडे वळवायचा हा प्रयत्न. पुस्तकाच्या आधारे वाचकाला आपलं वाचन आणखी विस्तृत करता यावं, हा, सर रतन टाटा ट्रस्टच्या सौजन्याने साकारलेल्या उपक्रमाचा हेतू, 'स्तुत्य' म्हणता येईल. लेखकांनी जितक्या तळमळीनं लिहिलं आहे, तितक्याच आपुलकीनं आणि नेमकेपणानं ज. कु. निर्मल, डॉ. राजम पिल्लै व सरोज वशिष्ठ या अनुवादकांनीही काम केलं आहे. संकल्पना सल्लागार गो. श्री. बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपादनाचं काम मात्र चोख झालेलं नाही आणि प्रूफ रीडिंगच्या चुकांमुळे वाचक ठायी ठायी अडखळतो. प्रकरणांच्या सुरुवातीचा परिचय, अवतरणं, ठळक मुद्दे, संदर्भ यांची मांडणी वेगळी व उठावदार न केल्यामुळे लेख सरसकट वाटतात आणि पुस्तक निरस होतं. 'पानभर फोटो' ही पुस्तकाची सर्वात प्रभावी बाजू असूनही त्या त्या फोटोखाली (किंवा श्रेयनामावलीतही) फोटोग्राफरचं नाव न देण्यात संपादकांनी काय साधलं ते कळत नाही. पान सातवर 'खालील व्यक्ती व संस्थांची उपक्रमाला मदत झाली-' असं म्हटलंय खरं, पण संबंधित यादीच गायब आहे! अशा यादीचं संदर्भमूल्य आणि श्रेय पाहता अशी चूक अक्षम्यच म्हणावी लागते.
सुलेखा नलिनी नागेश