पूर...

Started by शिवाजी सांगळे, May 21, 2015, 07:01:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पूर...

सलाईनच्या बाटलीतील थेंबा प्रमाणे त्याचे भरलेले डोळे टपटपत वहात होते. सलाईनला पुढे असलेल्या कुपी मध्ये एका लयीत ठीबकणारे सारे थेंब सरळ रेषेत कुठल्याश्या दुसऱ्या टोकात लुप्त होऊन जात होते. परंतु डोळ्यातून निघणाऱ्या त्या अश्रू थेंबाच काय? डोळ्यातून निघून न जाणे कोणत्या अज्ञात प्रवासाला चालले होते? डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या अश्रुंचे एक टोक तर दिसत होते, पण मध्येच कुठेतरी ते गायब होऊन जात होते, कोणत्या गुढ स्थळी रवाना होत होते ते अश्रू?

बऱ्याच दिवसांपासून तलावा सारखे त्याचे शांत खोल डोळे काय शोधित असावेत? बहुतेक स्वत:चा भूतकाळ शोधत असावेत! त्याच्या तोंडून अस्पष्ट चित्कार ऐकू आला, कदाचित त्याला पुन्हा डोक्यात कळ उठली असावी, ओठ आवळत पुन्हा डोळे मिटून घेतले त्याने, अश्रूंचा आणखी एक लोंढा गालांवरून ओघळत पुन्हा एका अज्ञात प्रवासाला निघून गेला.

आपल मन म्हणजे काय आजब रसायन आहे! ते एकांतात काय काय आठवत नाही? प्रत्येक गोष्ट आठवते जीच्यापासून सुख वा दु:ख भोगलेले आसते ती. निसर्गाचा नियमच आहे कि मानव प्रथम आपल्या दु:खाला गोंजारत रहातो, आणि त्याच आठवणीत रमतो व वर्तमानाला त्याच्या कसोटीवर मोजु लागतो, चांगलं झालं तर खुश नाहीतर दु:खी होतो.

त्याला स्वत:च्या लहानपणी जत्रेत पाहिलेला तो गोल फिरणारा झुला आठवला, ज्यावर त्याला वडीलांनी हात धरून बसवलं होतं आणि हळूच वडीलांनी स्वत:चे हात झुल्या पासून लांब लांब नेले होते, झुला आपल्या लयीत वेग घेऊ लागला होता, आणि तो बावऱ्या, भरलेल्या डोळ्यांनी वडलांचे हात शोधत होता, आज पर्यंत शोधतोय, आणि आता झुल्याने सुद्धा वेग घेतला आहे.

हळू हळु वय सुद्धा वेग घेऊन वाढत होतं, सुरवातीला शाळा, जीथं त्याच शिक्षणात मन रमत नव्हतं, तो तर रंगाच्या जगात हरवुन जात होता, चित्रकार व्हायचं होत त्याला. जसे जसे ईयत्तेचे स्तर वाढू लागले, त्याच्या इच्छाचे, स्वप्नाचें रंग फिके होऊ लागले आणि नेमके त्याच वेळी त्याच्या जवळच्या खास मित्राच्या वडीलांच्या बदली मुळे दुसऱ्या गावी जाणे झाले... तेव्हापासून तो एकटा, गप्प गप्प राहून स्वत:त हरवू लागला.

परंपरेनुसार शालेय शिक्षण संपले, आता त्याला कॉलेज मध्ये जायचे होते... तिथे सारच नव नवीन वाटू लागलं त्याला, पहिलतर ज्याच्यामुळे एक ओळख झाली होती तो युनिफॉर्म उतरला, आता रंगीत कपडे घालून कॉलेजला जायची खुशी होती, पण ती हि थोडाच वेळ, त्याच्याकडे इतके कपडे नव्हते, जे तो रोज नवीन वापरू शकेल, दोन जोड तर होते त्याच्या कडे कपड्याचे! तरीही दिवस सरकत राहिले, काही नवे मित्र भेटले, अभ्यास सुद्धा नीटपणे होऊ लागला, मित्रासोबतपण चांगली मैत्री जमली. काही मित्र सिगरेट, बियर घ्यायला शिकले, पहाता पहाता याने सुद्धा एकदा एक झुरका मारला... पहिला व शेवटचा... खूप त्रास झाला होता, डोळ्यातून पाणी आले होते त्याच्या तेव्हा. 

तरुणपणात खूप वेगवेगळ्या अनुभवातून त्याला जावे लागले होते... कालचक्रा सोबत तर त्याला चालणे भागच होते, तशी त्याची नोकरी बरी होती, नवखेपणात नोकरीत त्याला सारं वेगळं जाणवत होतं, नवे मित्र भेटले होते, नवे विचार, संस्कार होवु लागले होते त्याच्यावर. आजतागयत तो जसा जगला, त्या संबधीच त्याच काम होत, परंतु तस काम त्याने कघीच केलं नव्हतं, तरीही स्वत:ला त्याने ह्या साऱ्या नव्या व्यवस्थेत जमवून घेतलं होतं, आनंदात सुरु होतं त्याचं सार. त्या दरम्यान त्याची ओळख कविता सोबत झाली, का कोणास ठाऊक त्या दोघांना वाटू लागलं, जणु त्यांचा जन्म ह्याच भेटी साठी झाला आहे.

दोनेक वर्षे उलटुन गेली त्याच्या भेटीला, भेटीचं प्रेमात रुपांतर केंव्हा झालं ते कळलच नाही दोघांना.... अगदी घरापर्यंत गोष्ट गेली त्याच्या, एक चांगलं झालं दोन्ही घरचे लोक समजदार होते, कुठल्याही प्रकारे गोष्ट न ताणता हा संबध त्यांनी मान्य केला, तेव्हा त्यांना अस वाटलं कि त्यांनी अवकाशाला गवसणी घातली, खुप आनंदी झाले दोघं. तेव्हापासून जीवनाप्रती त्याची स्वप्ने आणखीच रंगीत होवु लागली, चित्रकलेसोबत तो आता कविता सुद्धा लिहु लागला ज्या त्याच्या कविताला पण खुप आवडु लागल्या. दोघांनी भविष्यात येणाऱ्या जीवनातील काव्यमय चित्रात रंग भरू लागले.   
   
एके दिवशी भल्या सकाळी निरोप आला, कविताची तब्बेत ठीक नाही म्हणुन, तो धावतच तीच्याकडे गेला, कविताला ताप होता, डॉक्टरना बोलावलं गेलं, म्हणाले साधारण ताप आहे काळजी नका करू, गोळ्या औषधे दिली, दोन दिवस बरं होत तीला, पुन्हा ताप भरला, ह्यावेळी तो जास्त होता, जरा बारकाईने तपासण्या केल्या गेल्या, आणि दोन्हीही कुटुंबियाच्या पाया खालची वाळू सरकली, कविताला कॅन्सरचा आजार झाला होता. तो तर पुरता हादरून गेला, आजाराचं त्याला समजलं पासून तो गप्प गुमसुम राहु लागला... असं कसं आहे माझं जीवन? जरा कुठे आयुष्याला थोडी उसंत, ठिकाणा मिळण्याची चाहूल मिळू लागली होती, तीलाच नशीबानं हूल दिली, जणु सुख त्याच्या नशिबी नाहीच? कसं अजब कोडं झालं आहे त्याच जीवन? तेव्हां आठवतं मुकेशचं गाणं "जिंदगी.... कैसी है पहेली हाएं, कभी ये हसाएं, कभी ये रुलाएं !"

कोडं

जीवन तर असेहि जगतोय मी
सहाय्याने आठवणींच्या, वेग थोडा मंद आहे,
चालतोय सोबतीने, तुझ्या जीवना
पकडून ठेव हात माझा, हरवण्याचे भय आहे !

झेलल्यात जखमा, जगाच्या हजारो
ठेवल्यात सजवून, जणू बक्षीस आहे,
जीव तर तसा, साऱ्यांनाच लावतो
आता केवळ, दु:खाशी प्रेम करतो आहे !

ठेऊ कसा विश्वास, जीवना?
तू तर अजूनहि, एक कोडं आहे,
दु:ख नाही मला, मरण्याचे माझ्या
प्रियजनांच्या मृत्युचे, भय सतावते आहे !

= शिवाजी सांगळे,
मो. +९१ ९४२२७७९९४१/+९१ ९५४५९७६५८९ ई.मेल.sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९