माय मराठी पुलं'वरचा अप्रतिम लेख!

Started by MK ADMIN, December 05, 2009, 10:03:08 AM

Previous topic - Next topic

MK ADMIN

पु.ल. आणि सुनीताबाई


वसंतराव देशपांडे तल्लीन होऊन गात होते. पुढय़ात पु. ल. देशपांडे त्यांचं गाणं ऐकत बसले होते. तेही तेवढेच तल्लीन. ढगांचं दार लोटून सुनीताबाई कधी आत आल्या दोघांनाही कळलं नाही. समेवर पुलंनी आपला उजवा हात हवेत झटकून दाद दिली आणि डोळे उघडले तर पुढय़ात साक्षात सुनीताबाई उभ्या, कंबरेला पदर खोचून! पुलंच्या पोटात गोळा गोळा आला आणि चेहऱ्यावर अजीजीचे भाव आले.

अगं? तू आलीस? आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्याखेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस! भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ! असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.

वसंतरावांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत सुनीताबाईंनी चौफेर नजर फिरवली. सगळा परिसर अस्ताव्यस्त. पायजमा खाली पडलेला, कुडता भिरकावून दिलेला, टॉवेल गुंडाळी करून पडलेला. पुढच्या मिनिटाचं आपलं भविष्य काय आहे ते पुलंना चटकन कळलं. त्यांनी शिताफीनं सुनीताबाईंचा हात धरला आणि म्हणाले, अगं आत्ताच आली आहेस नं, जरा बस दोन मिनिटं शांत आणि मग कर आवराआवर! पण सुनीताबाईंना कुठं धीर होता. त्या भाईकडं सात्त्विक रागानं पाहत म्हणाल्या, भाई, मला खरं खरं सांग, हा पायजमा इथं किती दिवसांपासून पडला आहे? त्यांच्या या प्रश्नावर वसंतराव फस्कन हसले. चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव आणण्याचा कमालीचा प्रामाणिक प्रयत्न करत पुलं म्हणाले, खरं सांगायचं तर नऊ वर्षांपूर्वी इथं स्वर्गात आलो तेव्हा पृथ्वीवरचे कपडे काढून इथले घातले, तेव्हापासून हा पायजमा असाच पडलेला आहे. तरातरा जात सुनीताबाईंनी तो पायजमा उचलला आणि म्हणाल्या, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, पण तेही खोटंच म्हणायचं! यावर तिरकसपणे पुलं म्हणाले, ते तुला स्वत:वरूनही कळायला हरकत नाही. वसंतरावांनी मग तंबोऱ्याला गवसणी घातली आणि म्हणाले, काय म्हणतेय आपली पृथ्वी? टॉवेलची घडी घालत सुनीताबाई म्हणाल्या, पृथ्वी काय म्हणतेय ते बघायला माझे डोळे कुठं शाबूत होते? आणि काही ऐकायची इच्छाही नव्हती, आजच्या दिवसाची वाट बघत काढली नऊ वर्ष कशीतरी! दोन क्षण ओली शांतता पसरली. मग पुलंनी सूत्रं हाती घेतली आणि म्हणाले, सुनीता, इथं येऊन एकच गोष्ट लक्षात आली, स्वर्गसुख वगैरे जे काय असतं ना, ते स्थळावर अवलंबून नसतं, आपल्यासोबत कोण आहे, यावर असतं अवलंबून ते! तुझा धाक असण्यात मला जे स्वातंत्र्य होतं, त्याची सर कशालाच नाही. मग सुनीताबाईंनी भाईंचा हात प्रेमानं हाती धरला आणि म्हणाल्या, आता आलो आहोत ना आपण पुन्हा एकत्र!

सुनीताबाई आल्यामुळं पुलंच्या अंगात नवा उत्साह संचारला. घर आवरत असलेल्या सुनीताबाईंना ते म्हणाले, आपल्या पृथ्वीवर तो अमृततुल्य चहा मिळतो ना, तर ते साफ खोटं आहे. खरं तर मी आता चहातुल्य अमृत शोधतो आहे, कारण चहाची गंमत अमृतात नाही. मग ते वसंतरावांकडे पाहत म्हणाले, वसंता, चल कुठं दूध, साखर आणि चहा-पत्ती मिळते का बघू जरा. वसंतराव पुलंचा बालसुलभ उत्साह कौतुकानं पाहत होते. त्यांनी पुलंना वास्तवाची जाण करून दिली. अरे पीएल, बाहेर जागोजागी अमृताच्या टाक्या बसवल्या आहेत, चहासाठी तुला कुंपण ओलांडून नरकात जावं लागेल. ते ऐकून पुलं म्हणाले, पृथ्वीवरचा प्रत्येकजण पुण्याऐवजी पाप गाठीशी बांधण्यासाठी का धडपडत असतो, ते इथं आल्यावर कळलं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कारण जिवंतपणीच तो दिसला तर कोणीच तिकडे फिरकणार नाही. मग चहाचा नाद सोडून पीएलनी बैठक मारली आणि म्हणाले, अगं सुनीता, जी.ए. इथंच राहतात, दोन घरं सोडून. तुला जर त्यांना पत्र वगेरे लिहायची असतील तर मी आहे कुरियर सव्र्हिससाठी. किचनचा ओटा साफ करता करता सुनीताबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या, काही टोमणे मारायची गरज नाही भाई, मी त्यांना भेटायला जाणारच आहे.

पण पुलं कसले गप्प राहतात? त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून! सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे? बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे? यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय? मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडीत पडत नाही काही करण्याच्या! सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं!

वसंतराव निघाले होते; पण मुगाच्या खिचडीचं नाव ऐकून ते थांबले. ते सुनीताबाईंना म्हणाले, अगं, इथं काही लिहिता येणार नाही त्याला, इथं फक्त मौज मजा करायची असते. काम करायला बंदी आहे इथं. त्यावर पुलं म्हणाले, आता ही आली आहे ना इथं, उद्यापासून इंद्र शेतात जाऊन नांगर धरेल आणि रंभा, उर्वशी जात्यावर बसून धान्य दळतील की नाही बघ! हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदलला आणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास? कोणाला दिल्यास? मुगाच्या डाळीवर पाणी ओतत सुनीताबाई म्हणाल्या, भाई, अरे देणाऱ्याला दिल्याचं सुख मिळावं असे घेणारे सापडणं मुश्कील झालंय. आपलं आयुष्य संपलं हे भाग्यच म्हणायचं.. अस्वस्थ मनानं वसंतरावांनी तंबोऱ्याची गवसणी काढून पुन्हा सूर लावला.


gaurig