स्वीटवाल्याचा मुलगा अचानक वारला तेव्हा

Started by विक्रांत, May 23, 2015, 10:35:29 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 
समोरच्या स्वीटवाल्याचा
मुलगा अचानक वारला
कर्तासवरता तरुण
क्षणात हातून गेला
गोरापान हसमुख उमदा
तत्पर सावध नेटका .

पंधरा वर्ष समोर दुकानात
रोज दिसत होता
जाता घेण्यास काही आत
देवून हलके स्मित
ओळख दाखवत होता.

कळले जेव्हा तो गेला
मनात तोच सवाल उठला
अरे हे काय वय आहे
असं अचानक मरायचं
मिठाई वाला झाला म्हणून
काय हार्टअॅट्याक यायचं

अन जाणवलं एक दु:ख
काहीसं अनपेक्षित
जे राहिलं मनात
खूप काळ उगाच रेंगाळत
गेलं हळूहळू विझत
तेव्हा लक्ष्यात आलं की
काही काही माणसं आपल्याला 
मैत्री नसून आवडतात
दूरवर राहूनही
खूप चांगली वाटतात
रोज दिसणाऱ्या हिरव्या डोंगरागत
गर्द चाफ्याच्या भरल्या झाडागत

त्यामुळेच त्याच असं निघून जाण
मनाला फार त्रास देत होतं
कितीतरी काळ मन हळहळत होतं

आणि हो ! त्याचं नाव !!
जेव्हा बोर्डावर लिहिले गेलं
तेव्हाच मला कळलं
कदाचित ते मला
कधीच कळलं नसतं
मी कदाचित कधीच कुणाला
विचारलही नसतं
आता तर तो मला
कधीच दिसणार नाही
पण त्याचं नाव मात्र मला
कितीतरी दिवस भेटत राहील
काळाचा विस्मृतीरुपी पडदा
खाली उतरेपर्यंत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/