तो अन मी

Started by विक्रांत, August 04, 2015, 10:31:41 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

माझे म्हणणे त्याला
अजिबात पटत नाही
त्याचे म्हणणे मला
व्यवहारी वाटत नाही
पण कधीतरी तो
माझे म्हणणे ऐकतो   
आणि माझ्या गाण्यास
साथ देण्यास येतो 
पण डोलता डोलता 
अचानक का न कळे
मधेच उठून जातो 
सारे सारे दूर सारून
कुठेतरी डोळे खुपसून
एकटाच बसून राहतो
विलक्षण व्याकुळता
त्याच्या डोळ्यात दाटते 
हृदयातील तडफड
सारे क्षितीज व्यापते
सुरांच्या पलीकडले
शब्दांच्या पलीकडले
काहीतरी त्याला जणू
सदैव खुणावत असते
पण धरू जाता हातून
निसटून जात असते
त्याच्या माझ्या जगातील
आकाश मिटत नाही
कोण आत कोण बाहेर
कधीच कळत नाही
तो गेल्यावर काही केल्या
माझे गाणे रंगत नाही
त्याच्या शिवाय कश्याला
अर्थही येत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/