रात्र

Started by pranaldongare, December 10, 2015, 11:43:46 AM

Previous topic - Next topic

pranaldongare

ती रात्र वेगळी होती,
तू माझ्यासोबत होती.
चंद्राने हलकी तेव्हा,
आरास मांडली होती.

वर्ख रुपेरी कोमल,
सोन्याचे त्यावर पाणी.
केसात माळली होती,
तू निशिगंधाची वेणी.

रंग तुझा तो गहिरा,
डोळ्यात साठला माझ्या.
आवेग नव्या स्पर्शाचा,
रंध्रात गोठला माझ्या.

रचलेले ओठांवर,
तू शब्द सुगंधी होते.
मी वेचून त्या शब्दांना,
श्वासात पेरले होते.

ती रात्र वेगळी होती,
स्वप्नांना जागवणारी.
देहांच्या लावुन वाती,
नात्याला चेतवणारी.

- शार्दुल