लावू कुंकू नको लावू

Started by विक्रांत, January 14, 2016, 10:41:21 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

लाख गर्भ धरुनही
दिवस भरत नाही
वेदनाचे वांझ ओझे
पुण्य उपजत नाही

आक्रंदून साकळले
स्वप्न उगा उगा राही
सृजनाच्या चाहुलीचा
फक्त जडभास होई

सप्तलोक पाकळ्यांचे
उमलण्या अधीर ही
निजलेली वीज परी
सृष्टी जाळतच नाही

रुणझुण पायातील 
अन हास्य खळाळते
पोथीतल्या कथेतील
बाळलेणे व्यर्थ वाटे

हरवल्या भ्रताराचा
संग जीवास घडेना
लावू कुंकू नको लावू
कुणा पुसावे कळेना

दर्पणात उभी कणी
केस मोकळे सोडूनी
वाटा गेल्यात मोडुनी
सांज येतसे भरुनी

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/