विविध रंगी नोर्वे

Started by Siddhesh Baji, December 18, 2009, 02:23:12 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

नॉर्वेमधील स्तावांगर या शहरात प्रथम पाऊल टाकले तेव्हा 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' या माहितीव्यतिरिक्त नॉर्वेबद्दल मला काहीही माहीत नव्हतं. या देशाची राजधानी 'ओस्लो' आहे, एवढीच अधिकची माहिती होती. पुण्यातल्या 'हनीवेल ऑटोमेशन' या आमच्या कंपनीला इथे एक प्रोजेक्ट मिळाला होता. नॉर्वेला येण्याआधी मी दोन वर्षे इंग्लंडला होतो. त्यामुळे तिथल्या आठवणी कुठेतरी मनात रेंगाळत होत्या. इंग्लंड व नॉर्वे हे देश अंतराने परस्परांपासून फारसे दूर नाहीत, पण संस्कृती व भाषेने मात्र प्रचंड वेगळे आहेत.

भारतातल्या प्रचंड गर्दीतून नॉर्वेला येणं म्हणजे पृथ्वीवरील वातावरणातून अंतराळातील पोकळीत गेल्यासारखं वाटतं. आमच्या डोंबिवलीतल्या तीन गल्ल्यांत जेवढी माणसं दिसतील, त्याच्या दहा टक्केसुद्धा माणसं मला इथे विमानतळ ते माझं इथलं घर या १५ कि. मी.च्या प्रवासात आढळली नाहीत. इथे नक्की राहतं कोण? घरं पाहाल तर राजवाडे आहेत. प्रचंड हिरवळ, सुंदर हिरवेगार डोंगर, स्वच्छ रुंद, आखीवरेखीव रस्ते, प्रशस्त छान घरं.. सर्वत्र नजर ठरत नव्हती. जिथं बघावं तिथं सौंदर्यचं सौंदर्य होतं. अहो, माझी टॅक्सीसुद्धा मर्सिडीज होती. आयुष्यात कधी अशा टॅक्सीमध्ये बसेन असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. घरी पोचलो. माझा सहकारी नितीन मोघे माझी वाटच पाहत होता. तो माझ्या आधी एक महिना स्तावांगरमध्ये आला होता. घरचा पत्ता इतका छोटा होता! गल्लीचं नाव, घराचा नंबर व पिन कोड. बाकी काही नाही. टॅक्सीवाल्याने उरलेले सुटे पैसे व रीतसर बिल दिलं. मी लिफ्टमधून घरी आलो. घर म्हणजे.. काय सांगू! लाकडी फ्लोरिंग. फ्लोरिंगला हीटर लावलेला. प्रशस्त घर. सर्व सुखसोयींनी सुसज्ज. आयकियाचा प्रशस्त सोफा. टेरेस पूर्णपणे काचेने झाकलेली. टॅरेससमोर डोंगर.. समुद्र..  इथे काम करता येईल का!!?!
मी ऑक्टोबर महिन्यात आलो खरा, पण पुढच्याच दोन आठवडय़ांत इथलं निसर्गाचं रौद्ररूप मला पाहायला मिळालं. ऑक्टोबर महिना हा पानगळीचा महिना. सुसाट वारा, पाऊस आणि येणाऱ्या जबरदस्त थंडीची चाहूल.
पण आपण या ऋतुचक्राकडे नंतर वळूया..
हा देश 'व्हायकिंग' जमातीचा देश म्हणून ओळखला जातो. व्हायकिंग म्हणजे दर्यावर्दी किंवा सागरी चाचे अथवा व्यापारी. आपल्या होडय़ांतून हे लोक तीन ते चार दिवसांचा प्रवास करून स्कॉटलंडला जायचे. तिथून धनधान्य, माणसं जे काही मिळेल ते घेऊन परतायचे. हा काळ साधारणत: ९०० ते ११०० व्या शतकातला. त्यानंतर इथे बरेच राजे होऊन गेले. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने दोन दिवसांत पूर्ण नॉर्वे काबीज केले. मनुष्यहानी टळावी म्हणून नॉर्वेच्या राजाने शरणागती पत्करली होती. तरीही त्या दोन दिवसांत स्तावांगरजवळील उल्टेडाल या छोटय़ाशा प्रदेशात २०० नॉर्वेजियन सैनिकांनी ८०० जर्मन सैनिकांना पळवून लावले होते. व्हायकिंगचे रक्त शांत बसले नव्हते!
१९६५-७० च्या दरम्यान नॉर्वेच्या आजूबाजूच्या समुद्री भागात  तेल व नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे सापडले आणि इथूनच खऱ्या अर्थाने या देशाचे भाग्य बदलले. स्तावांगर हे युरोपीय प्रदेशाचे तेल व वायूचे एक प्रमुख केंद्रस्थान बनले. जगभरातून तंत्रज्ञ आणि अभियंते इथे यायला लागले. बघता बघता नॉर्वे हा एक श्रीमंत  देश झाला! या देशाचे चलन 'क्रोनर' आहे. 'क्रोनर' हा शब्द 'क्राउन' या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश आहे. इथली भाषा 'नॉस्र्क' आहे. जर्मन भाषेशी थोडीशी जवळीक साधणारी. नॉर्वे हा स्कँडिनेव्हीयन देश आहे. म्हणजेच उत्तर युरोपमधील डेन्मार्क, स्वीडन, आइसलंड व फिनलँड या देशांबरोबरचा. आज हा देश जगातील एक सुंदर, सुरक्षित, श्रीमंत व अतिशय उच्च दर्जाचे राहणीमान असलेला देश म्हणून ओळखला जातो. हाराल्ड (पाचवा) हे इथले राजे आहेत आणि येन्स स्टॉलटेनबर्ग हे पंतप्रधान.
इथली माणसं अतिशय प्रेमळ व सुस्वभावी आहेत. ८९% श्रीमंत माणसं असलेला हा देश. अहो, इथे भेंडी ६० क्रोनरला १ किलो (१ नॉ. क्रोनर म्हणजे ७ ते ८ भारतीय रुपये), कोथिंबीर १५ क्रोनर जुडी व बीयरचा एक ग्लास ६० क्रोनरला.. करा हिशोब! इथल्या प्रत्येक घरात सरासरी दोन तरी चारचाकी वाहनं असतातच. ऑडी, मर्सिडीज, रेनॉ, बी. एम. डब्ल्यू., वॉल्वो, फोर्ड, अल्फा-रोमियो.. फेरारी.. बस्स अशीच सारी मॉडेल्स! गाडय़ा बघताना आपली नजरही ठरत नाही. घरं तर इतकी सुंदर आहेत की विचारू नका. निसर्गाच्या सान्निध्यात त्याचं सौंदर्य जपत आधुनिकीकरणाचा आस्वाद घ्यायचा, तर नॉर्वेसारखा दुसरा देश नाही. कधी कधी इथल्या निसर्गसौंदर्यापुढे इंग्लंडमधील विंडरगिअरचं सौंदर्यदेखील फिकं पडतं! असो. इथे ूस्र्, कउअ, फएटअ सारखी मोठमोठी शॉपिंग मॉल्स आहेत. इथे स्थानिक आशियाई दुकानांत आपले पदार्थ म्हणजे डाळी, मसाले इ. मिळतात. थोडं महाग आहेत, पण मिळतात.
इथे नोव्हेंबर ते मार्च प्रचंड थंडी असते. एप्रिल व मे हे वसंत ऋतूचे महिने. जून ते ऑगस्ट उन्हाळा आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर हे प्रचंड, सुसाट वाऱ्याचे दिवस. तसं पाहिलं तर युरोप, नॉर्वे, स्वीडन या देशांमध्ये पाऊस हा बाराही महिने येऊन-जाऊन असतोच. पण हे सर्व ऋतू इथे ठळकपणे जाणवतात. वसंत ऋतूमध्ये डॅफोडिल्सची (विल्यम वर्डस्वर्थ आठवला का?) रंगीबेरंगी अप्रतिम फुले, टुलिप्स सर्वत्र दिसायला लागतात. या सर्व अलंकारांनी नॉर्वेचे 'फ्योर्ड' (ा्न१)ि सजू लागतात. इथे समुद्राचं पाणी जिथे जिथे आत- म्हणजे भूभागात येतं, त्याला फ्योर्ड असं म्हणतात. हे फ्योर्डस्; नॉर्वेचे भूषण ु नैसर्गिक खजिना आहे. इथल्या जलसफरींचा (क्रूझेस) आस्वाद घ्यायला उन्हाळ्याशिवाय पर्याय नाही. उन्हाळ्यात इथे दिवस मोठे होतात. बरोबर मध्यरात्री १२ ला 'नॉर्थ कॅप'ला सूर्य दिसतो. आम्ही राहत असलेलं स्तावांगर हे शहर दक्षिण नॉर्वेला आहे. आमच्या इथे उन्हाळ्यात सूर्योदय पहाटे तीनला व सूर्यास्त रात्री ११.३० वा. होत असे. त्यामुळे घरांना काळे पडदे लावावे लागत. रात्रीचं जेवण जेवताना दुपारचे जेवतोय असेच वाटत असे. उन्हाळ्यात तापमान ३० ते ३५ डिग्री सें. इतकं वर जातं. उन्हाळ्यात नॉर्वेमध्ये फिरायला जाण्यासारखी शहरं म्हणजे ओस्लो, स्तावांगर, क्रिस्टियानसेंड, ट्राँडहाइम व बर्गेन! बर्गेनजवळील 'फ्लाम' ही जागा म्हणजे नॉर्वेमधील स्वित्र्झलड मानतात. लख्ख सूर्यप्रकाशाच्या या दिवसांत नॉर्वेकर तासन् तास पाण्याजवळ मगरीसारखे पडून असतात. तिथेच ते (बार्बेक्यू) जेवण बनवतात, जेवतात, मासेमारी करतात व परत जाताना व्यवस्थित स्वच्छता करून जातात. उन्हाळ्यातला उत्साह व पर्यटन सप्टेंबपर्यंत संपून जातं.
मग सुरू होतो पानगळीचा ऋतू. पण झाडावरची पानं नाहीशी होतानासुद्धा निसर्ग आपल्याकडच्या रंगांची मुक्तपणे उधळण करत देतो. हिरवी झाडंही लाल, पिवळी, केशरी अशा विविध रंगांनी सजून जातात. उन्हाळ्यात सजलेलं सौंदर्य हे नोव्हेंबपर्यंत पूर्णत: फिकं होऊन जातं. आणि मग सुरू होते खरी कसोटी.. हिवाळा. २० डि. सें.पर्यंत तापमान खाली जातं. ऑस्लो व स्तावांगर समुद्रकिनारी असल्यामुळे फक्त - १० डि. सें. अशी आकडय़ांची चढाओढ सुरू होते. छानपैकी बर्फवृष्टी सुरू होते. भरउन्हात बर्फवृष्टी सुरू झाली की सूर्य असा काही झाकला जातो, की क्षणभर जयद्रथाची गोष्ट आठवते! सूर्यदर्शन फक्त चार ते पाच तासच होतं हिवाळ्यात. सकाळी नऊला सूर्योदय आणि दुपारी ३.३० ला मिट्ट काळोख. पण इथल्या बर्फाची मजाच काही और असते. जसं आपल्याकडे जन्माला येणारे बाळ हे क्रिकेटचं उपजत ज्ञान घेऊन येतं, तसंच इथलं बाळ हे आइस-स्केटिंगचं ज्ञान घेऊनच जन्माला  येतं. आम्ही इथे स्कीइंगची मजा मनसोक्त उपभोगली.
असं हे विविधरंगी नॉर्वे. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न माणसं. इथल्या माणसांना भारताबद्दल खूप आकर्षण आहे. श्री श्री रविशंकर, होमिओपथी, दिवाळी, जंगल, प्राणी, नद्या, गर्दी व मसाले- म्हणजे 'भारत' अशी इथे आपली ओळख आहे. 'अभियंत्यांचा देश' अशीही एक आपली ओळख आहे.
म्हणता म्हणता मला स्तावांगर या शहरात तीन वर्षे झाली. इथल्या वास्तव्यामुळे आजूबाजूच्या इतर देशांचंही पर्यटन झालं. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, हरतऱ्हेची माणसं भेटली, विविध निसर्गरूपं अनुभवली. थोडक्यात- एका बेडकाला डबक्याच्या बाहेरचं जग पाहण्याची संधी मिळाली. खूप छान आठवणींचा साठा आता आयुष्यभर राहणार आहे सोबत. जाता जाता एवढंच सांगतो की, एकदा शक्य असेल तर वाट वाकडी करून या देशात १५ दिवस तरी जाच. आपल्या देशाचा सार्थ अभिमान आहेच (जरी राज्यकर्त्यांनी त्याची वाट लावली असली तरीही!), पण स्वच्छ, सुंदर निसर्गाची मजा लुटायची असेल तर एकदा इथे पाय मोकळे करा. पैज लावून सांगतो- फोटो काढता काढता कॅमेऱ्यावरची बोटंही थकतील!!!

gaurig

Anek dhanyawad. Ase mahitipurna lekh prasiddha kelybaddal. At least baherche desh, tithali sanskruti hyanchi thodifar mahiti tari milate asha articles madhun.