ती गेली तेव्हा...

Started by शिवाजी सांगळे, January 16, 2016, 01:39:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ती गेली तेव्हा...

मराठी साहित्यातील शब्दांचे जादुगार, काहीसं गुढ शैलीत लिहिणारे कविवर्य श्री माणिकराव गोडघाटे उर्फ कवी ग्रेस याचे मोहवून, भारून टाकणारे शब्द, आणि तितकाच पंडित ऋदयनाथ मंगेशकराच्या आर्त आवाजात असलेलं एक गाणं राहुनराहून मनात घुटमळत राहतं ते म्हणजे "ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता" केवळ अप्रतिम म्हणावं लागेल. जेव्हां केव्हा हे गाणं कानावर पडतं, त्या क्षणा पासून पुढील चार पाच दिवस ते मनातून पुसलं जात नाही.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

आईच्या विरहाने व्याकुळ झालेल्या मुलाची व्यथा या गाण्यात ओतप्रोत भरलेली दिसते, त्यावेळचे वातावरण पण व्यथित झालेले, रिमझिम असला तरी तो पाउस जोराचा होता, सूर्य सुद्धा आपली अडकून पडलेली किरणे सोडवायचा प्रयत्न होता असं गंभीर वातावरण होतं.

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

कवी लिहितात अश्या ह्या वातावरणात वारा पण सावधपणे पाचोळा उडवीत होता, आणि एकाद्या ओसंडून भरलेल्या नभाने कोसळावे असा मी रडत होतो. कारण ती माझी आई होती. खरया अर्थाने इथे व्याकुळ शब्दाचा अर्थ जाणवतो, अंगावर येतो, ऋदयनाथांनी दिलेल्या संगीताची व तितक्याच आर्ततेने आळवलेल्या स्वरांची, किमया अशी कि जणू ही घटना आपल्या सोबत, समोरच घडते आहे, गुंग करून सोडणारी, काही काळ त्यातून बाहेर पडताच येत नाही.

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

अंगणात खेळत असता हाक मारून बोलावणारी आई नसणार, आणि त्यातून झालेली पोरकेपणाची व आपलं बाल्य हरवल्याची, जाणीव फारच जीवघेणी आहे, खरचं आत्ता पाठीराखा कोणीच असणार नाही, आणि जे असणार आहे त्यासाठी कवींनी घेतलेलं खिडकीवरील कंदिलाचं रूपक केवळ काळजाला हात घालणारं आहे.

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रोपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता

मुळ गीतात नसलेल्या वरील ओळी सुद्धा एका वेगळ्या अलिप्तपणाची जाणिव करून देतात जसं रक्त आहे पण त्यातुन निर्माण होणारा गहिवर नाही, व द्रोपदीला वस्त्रे पुरविणारा कृष्ण सुद्धा त्या वस्त्रांत नागडा होता, असं बेधडक लिहून आपलं वेगळेपण दर्शविणारे ग्रेस खरचं ग्रेट म्हणायला हवेत. काहींच्या मते भले हा वादाचा मुद्धा असेलही, पण भावनेचा एक अविस्मरणीय अनुभव देणारं, वेगळ्याच धुंदीत नेउन अंतर्मुख करणारं असं हे गाणं आहे, हे नक्की.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941 +919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९