या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले

Started by dhanaji, January 29, 2016, 06:16:08 PM

Previous topic - Next topic

dhanaji

द्यायचे राहून गेले , घ्यायचे राहून गेले ...
या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले ...।
तुज न यावी नेत्र भाषा अन मला भय घेरते
थरथरे हा श्वास अवचित आणि मी संकोचते
शब्द अधरी थबकले पण उमटणे राहून गेले .... ।
या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले ...।
जाणते मी प्रेम सखया , काळजा तव बिलगते ...
परी तुला शब्दात हळव्या बोलणे ना गवसते ...
अधीर मी आतुर तरीही मौन तव रडवून गेले ... ।
या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले ...।
वेचले पदरात क्षण मी , हसून झाल्या चांदण्या ...
धुंद त्या सुख स्मरण घटिका खुलवती विरहास या ...
चंद्र तू अन मी चकोरा , चांदणे स्पर्शून गेले ... ।
या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले ...।
हाय मी का सादते तुज , विरह अग्नी भ्रमवितो ...
परी तुझ्या हृदयी न सखया , दाह वणवा स्पर्शितो ...
दग्ध झाले मी परी तव पोळणे राहून गेले ...।
या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले ...।
बोलना कधी एकदा मज , प्रकट कर गुज अंतरी ...
मी तुझ्या प्रेमात जळते , समई जळते मंदिरी
भाबडे मन तिष्टले तव प्रकटणे राहून गेले ...।
या मनीचे त्या मना , सांगायचे राहून गेले ...।
Mrs. Ujjwala Mudappu