चादर धुक्याची ...2

Started by शिवाजी सांगळे, February 21, 2016, 11:43:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आता तर मानवाने साऱ्या जगभर आपला विस्तार वाढवला, तो नविन गोष्टी शिकू लागला, लिहू लागला, स्वतःच्या स्वार्थासाठी व इतरांवर हुकुमत करण्यासाठी एक दुसऱ्या सोबत भांडणे, मारामाऱ्या, लढाया होऊ लागल्या, त्यांत कित्तेक निरपराध जीवांच्या हत्या झाल्या, कधी समोरासमोर तर कधी दगाबाजीने, याला इतिहास साक्ष आहे, कि पुत्रानेच आपल्या जन्मदात्या पित्याची सत्तेसाठी हत्या केली आहे. स्वार्थापुढे मानव आंधळा झाला. या नंतर एक वेळ अशी आली कि मानवाला आकाशात भरारी मारावीशी वाटली, तो आकाशात उडू लागला व तिथून आपआपली साम्राज्ये सांभाळू लागला, ते करता करता अन्य साम्राज्ये आपल्या कब्ज्यात कशी येतील याचा विचार करू लागला, आणि त्याच कारणांमुळे जगात तीन तीन महायुद्धे झाली, कोणी हरलं कोणी जिंकल तरीही माणुस समाधानी नाही होऊ शकला. कोणती भूक, कोणती स्वप्ने अजुन बाकी होती त्याची?

        स्वप्ने पाहणं व ती पूर्ण करणे हि माणसाची सवयच आहे, त्या ध्येय्याने तो पछाडला गेला, आता तो अंतरिक्षावर आपली नजर ठेऊ लागला, तिथे कोणता जीव रहात असेल? त्याचं जीवनमान कसं असेल? पृथ्वीचा मानव तीथे आपली वस्ती करू शकेल का वगैरे शक्यतांचा अभ्यास त्याने सुरु केला. काही वर्षीपुर्वी त्याने चंद्रावर आपली पाऊले उमटवली व आता मंगळ ग्रहा संबंधी संशोधन सुरु केले आहे. मानव सुरवातीपासूनच संशोधक वृत्तीचा, जर एखादि गोष्ट त्याने शोधली वा काही संशोधन केले रे केले तर त्याच्या पेक्षा जास्त चांगलं आपण काय करू शकतो? या साठी तो तळमळत राहतो, त्याची भूक तीव्र आहे. याच भूकेपोटी आज उपग्रह, संगणक, मोबाईल फोन इत्यादी अत्याधुनिक शोध लागले, तरीही आणखी नव्या साठी त्याचे प्रयत्न निरंतर सुरु आहेत.

       अत्याधुनिक शोधासाठी जेवढे काही प्रयत्न सुरु आहेत त्या मध्ये मनुष्य स्वतः ज्या पृथ्वीवर राहतोय तिच्याकडे तो लक्ष देत नाही. आधुनिकीकरणासाठी जे काही प्रयोग होत आहेत ते याच पृथ्वीवर होतात, ज्यांच्यामुळे आज सर्वत्र कचऱ्याचे, प्लास्टिकचे डोंगर उभे राहू लागलेत, फैक्टरी, कारखान्या मधुन निघणारे वेस्ट, केमिकल, पाणी वगैरे मुळे अनेक नद्या प्रदूषित होत आहेत, ज्या कारणे नद्यांच पाणी पिण्या योग्य राहिलेले नाही. सृष्टीची जी नैसर्गिक ठेवण आहे ती नष्ट होऊन गेली, वाढत्या लोकसंखे मुळे केवळ सिमेंटची जंगले मात्र वाढत आहेत, परिणामस्वरूपी मूळ जंगली जनावरांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे, कित्तेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत व बऱ्याचश्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

        उन्नती, प्रगतीच्या नावाखाली सृष्टीचा ज्या प्रकारे नाश होत आहे त्या मुळे मनुष्याला सुखी व्हायला हवे ना? परंतु यांचे उत्तर नकारार्थी असेच आहे, कारण अस्तित्वा साठी, वर्चस्वा साठी आपआपसांत भांडणे होत आहेत, जगभर एकमेकांवर विश्वास न राहिल्याने आतंकवाद फोफावत चालला आहे. जगातल्या कोणत्याही देशाचं उदाहरण घ्या, कुठेही शांतता, चैन नाही आणि आता ह्या गोष्टीचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.
तसे तर आपण सारे या सृष्टीचे, तिच्या पासून निर्मित अविभाज्य घटक आहोत, जरी आपलं प्रत्येकाचं ठिकाण वेगळं आहे, तरीही सर्व मानव जातीचं नैसर्गिक रूप एक सारखंचं आहे, प्रत्येकाचा रंग वेगळा असला तरी सगळ्यांच्या शरीरात एकाच प्रकारचं रक्त आहे, सर्वांचे शारीरिक अवयव सारखेच आहेत. निसर्गाने जर त्या साऱ्यात कोणता फरक ठेवला नाही तर तो भेदभाव करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला?

       अशाच काही विचारात मी होतो, त्याचवेळी दूरवर कुठूनतरी घोषणाबाजी ऐकू येऊ लागली... जिंदाबाद, लेके रहेंगे, हमसे जो... वैगैरे, अचानक ऐकलेलेल्या घोषणाबाजीने मी क्षणभर गांगरलो, माझ्या हातून कॉफीचा कप पडतांना राहिला. दरम्यान ऊन बऱ्यापैकी आलं होतं, धुकं पण सरलं होतं, आणि मला समोरचं सारं दृश्य स्वच्छ दिसु लागलं, जे वास्तव होतं... मग एवढा वेळ मी कुठे होतो? एका धुक्याच्या चादरीत दडला गेलो होतो, जीवनाच्या एका तरल, जल सदृश्य भासात हरवलो होतो, धुक्याची चादर उठे पर्यंत.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941 +919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९