तू रंग भरत गेलीस

Started by dhanaji, February 22, 2016, 11:59:49 AM

Previous topic - Next topic

dhanaji




तू रंग भरत गेलीस
माझ्या आकांक्षांच्या रिकाम्या रांगोळीत
स्वतःकडे फ़क्त पांढरा रंग ठेवून
आणि मी रंगत गेलो
वेगवेगळ्या रंगानी...


वेगवेगळ्या नक्षीदार वळणावळणांनी
तुझ्या बोटाच्या चिमटीतून
सहजपणे निसटत होते रंग
प्रत्येक चौकटीत भरण्यासाठी
मी बघत होतो इंद्रधनुष्य
तुझ्या डोळ्यांतून पाझरणार्‍या पावसामधेही...


पांढर्‍या वस्त्राखेरीज कधी दिसली नाहीस
लहानाचे मोठे झालो तरीही
कुतूहल वाटायचे तुझे तेव्हा
जेव्हा तू दिसायची एखाद्या साध्वीसारखी
आणि पुटपुटत असायची अनेक मंत्र
मनातल्या मनात
दिवसभर घरात काबाडकष्ट करतानाही....


आई तुला खरं सांगू
तुझ्या कपाळावर कुंकू का नाही
असं विचारावं वाटायचं बर्‍याचदा
तुझ्या गळ्यात का नाहीत
इतर बायकांसारखे सोन्याचे दागिने
पण तुझ्या ओठावर असलेलं
काटेरी कडा असलेलं ओलसर हसू पाहून
कधी हिंमत झाली नाही लहान असताना...


तू जपलास पांढरा रंग
देव्हार्‍यात महादेवाला वाहिलेल्या फ़ुलांप्रमाणे
पुरवत गेलीस पाणी
माझ्या आयुष्याच्या रोपट्याला
मोठा डेरेदार वृक्ष करण्यासाठी..


अजूनही जेव्हा तू डोळ्यावाटे पाझरतेस
मातृत्वाने गहिवरलेले पावसासारखे थेंब
तेव्हा लपावे वाटते तुझ्या उबदार कुशीत
तुझ्या झिरमिळत्या पोटाला मिठी मारून
आणि वाटते सगळे रंग देऊन टाकावेत तुला परत
माझ्या नसानसात धावणार्‍या रक्तासकट
तुला पहिल्यासारखीच बनवण्यासाठी.....


-- संतोष वाटपाडे (नाशिक)