भिती - बरी का वाईट?

Started by गणेश म. तायडे, March 15, 2016, 06:33:39 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सर्वांच्या परिचयाचा शब्द म्हणजे "भिती". मला तरी नाही वाटत कि असा कुणी व्यक्ती असेल कि ज्याला कशाचीच भिती नसेल. कारण भिती हि आपल्या भावनेतील एक मुद्राच म्हणावी लागेल. मग भिती असणे बरे का वाईट? हे ठरवणे खरंच खुप कठीण आहे. परंतु आपण जर या भितीला सकारात्मक दृष्टीने पाहिले असता, भितीचे खूप फायदे सुद्धा दिसून येतील. जसे चुकीचं काही करताना घरच्यांची भिती, व्यसन करताना मरणाची भिती, अपराध करताना न्याय व्यवस्थेची भिती आणि अभ्यास नाही केला तर नापास होण्याची भिती.

कधीतरी डोळे उघडे करुन जर आपण आपल्या सभोवताली पाहिले तर एक भितीचे वातावरण तयार झालेले आहे, असं दिसेल. मग ते चांगले पण असू शकते किंवा वाईट पण! वाईट गोष्टींवर बोलणे टाळून जर आपण चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला वाटणारी भिती, आपल्याला नेहमी प्रगतशील करेल हे मात्र नक्की! या असल्या चांगल्या भितीचा एक माझा अनुभव तुमच्या सोबत शेयर करायला आवडेल.

मी माझे प्राथमिक शिक्षण हे एका नगर परिषद च्या एका साधारण शाळेतून पुर्ण केले. तसा मी लहानपणापासून घरी शांत पण बाहेर थोडा खोडकरच होतो. आमची शाळा सकाळी असायची त्यामुळे काहीपण झाले तरी नास्त्यामध्ये मार मलाच बसायचा. आमच्या गुरुजींचा मी लाडका विद्यार्थी (मार खाण्यासाठी)! ते मला नेहमी पहिल्याच आसनावर बसवायचे आणि वर्गात काहीपण झाले तर मलाच रट्टे बसायचे.

एकदा मस्त थंडीचे दिवस होते. सकाळी शाळेत मिळणारं गुलाबी दुध पिवून आम्ही वर्गात बसलो होतो. तेवढ्यात आमचे गुरुजी आले आणि म्हणाले, "छाती आणि उंची मोजण्याकरीता एक एक जण समोर या." माझे दोन चार मित्र गेले आणि गुरुजींना माप दिले. गुरुजी खुर्चीमध्ये बसून होते आणि प्रत्येक मुलाची छाती आणि उंची मापत होते. जेव्हा माझी पाळी आली, तेव्हा मी पण गेलो आणि जाऊन गुरुजींच्या समोर उभा राहिलो. गुरुजी म्हणाले, "समोर ये." मी हळूच पुढे सरकलो. गुरुजी पुन्हा ओरडले, "कमी ऐकू येत का? समोर ये म्हटलनं!" मग मी काहीच न विचार करता फटकन समोर गेलो. आणि जसा समोर गेलो तसाच गुरुजींच्या ओरडण्याला सुरुवात झाली. मला काही समजण्या अगोदरच गुरुजींनी मला मारणे सुरु केले. त्या दिवसचा मार म्हणजे "बापरे!" अजून पण माझ्या अंगावर काटा उभा राहतो.

रागाच्या भरात त्या दिवशी मी ठरवले कि आता मी शाळेत जाणार नाही. मी घरी काहीना काही बहाणा करत चार पाच दिवस शाळेत गेलोच नाही पण मग आई पासुन काय लपणार? शेवटी आई मला शाळेत घेऊन गेली आणि आमच्या गुरुजींना विचारले, "नेमक काय झालं? का नाही येत हा शाळेत?" मग गुरुजींनी आईला सर्व सांगितले आणि म्हणाले, " माझ्या पायाला जखम झालेली होती आणि त्याचा पाय त्यावर पडला. म्हणून मी त्याला रागाच्या भरात मारले." मग आई मला समजावून म्हणाली, " आता तुला गुरुजी मारणार नाही, आता तु शाळेत नियमीत येत जा." मी पण आईचे ऐकून वर्गात जाऊन बसलो. आई गेल्यानंतर गुरुजींनी मला बोलावले आणि म्हणाले, " तुला मी नापास करणार आहे, तुला पास होऊच देणार नाही."
नापास होण्याची भिती माझ्या मनात वाढत होती. पण आमच्यावर लढाऊ संस्कार होते म्हणून बरं! मी ठरवले कि जर आपण चांगला अभ्यास केला तर मग आपल्याला कोण नापास करणार? म्हणून मी नापास होण्याच्या भितीपोटी एक सकारात्मक मार्ग निवडला आणि त्यामध्ये यश प्राप्त केले. नंतर शिक्षणात मी कधी मागे वळून पाहिले नाही.

हा अनुभव शेयर करण्याचे एक कारण म्हणजे आता लवकरच दहावी, बारावी आणि इतर निकाल लागणार आहेत. काहींच्या मनात नापास होण्याची भिती घर करून बसली असेल. पण तरी माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे कि त्यांनी धीर न सोडता, आपल्या भितीला आपले सामर्थ्य बनवून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे. कारण अंततः तुमची भिती हिच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवणार आहे!

- लेखक:
गणेश म. तायडे, खामगांव
मो. नं. ८९२८२३६१२२