कधी कधी

Started by abhishek panchal, April 06, 2016, 10:51:13 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं
दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं
कधी कधी ,
स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं

अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं
वाईट काळातच , खरं जग दिसतं
तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं
कधी कधी ,
ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं

पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे
मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते
कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं
कधी कधी ,
परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं

देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले
देता देता सारे , जरा घाईत मरून गेले
चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं
कधी कधी ,
अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी मरावं लागतं


सारं दिसूनसुद्धा , तोंड मुकं होई
भीतीपोटी कधी , दृष्टीसुद्धा जाई
पेटलेल्या मनाला , शांत करावं लागतं
कधी कधी ,
आगीलाही त्या , पाण्यात शिरावं लागतं


संधीकडे कडे कधी , डोळे बघत असतात
व्याकूळतेने फक्त , एक क्षण मागत असतात
संधी मिळत नाही , तरी आशेत राहावं लागतं
कधी कधी ,
इच्छा नसतानाही , हात बांधून जगावं लागतं

तडजोडींशीच मग , जिव्हाळा वाटू लागे
संकटांची मालिका घेऊन , नियती येई मागे
जिंकता जिंकता कधी , उगाचच हरावं लागतं
कधी कधी ,
पूर्ण संपूनही , थोडसं तरी उरावं लागतं


                                  - अभिषेक पांचाळ