लग्न म्हणजे काय असतं ?

Started by abhishek panchal, April 17, 2016, 12:09:43 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

लग्न म्हणजे काय असतं हो

बघायचं ठरतं ,
ओळख कुठून निघते .
फोटो जातात घरी ,
देवाण घेवाण होते .

फोटोवरून मग ,
बैठक होते घरी .
मुलगा येतो बघायला ,
मुलीच्या दारी .

पत्रिकेतले दोष गुण
मान पान , देणं घेणं
जुळून आले कि हे सारे ,
जळून येतात मनं

बैठकी होतात ,
बस्ताही बसतो .
लगीनघाईत व्यस्त ,
हरएक दिसतो

शेरवानी , साडी
सारंकाही ठरतं
बघता बघता घर ,
माणसांनी भरतं .

तारीख एक ठरते
मंडपही सजतो .
नवरीला पाहून मंडपी ,
मग नवराही लाजतो .

एक मुलगा , एक मुलगी
एक नवरा , एक नवरी
अक्षदा अन आशीर्वाद घेऊन
बारात जमली हावरी

अक्षदा पडतात ,
आशीर्वादही मिळतो .
नवरीचा भाऊ हक्काने ,
नवऱ्याचा कान पिळतो .

निरोप घेता नवरी ,
रडती मग सारे .
आशीर्वाद देती ,
नांदा सौख्यभरे .

आशीर्वाद घेऊन सगळ्यांचे ,
नवं पर्व सुरु होतं .
माझं मन तुझं मन ,
एक होऊन जातं .

जबाबदारीचं भान ,
अचानक कळतं .
संसार असं त्याला ,
गोंडस नाव मिळतं .

नवरा बायको जणू ,
दोन चाकं होतात .
संसाराचा गाडा ,
खांद्यावर वाहतात .

दोन वेगळी मने ,
एक होऊन नांदतात .
दोन कुटुंबांना ,
एका धाग्यात बांधतात .

जोडायची रीत आहे ,
जोडलेच जातात .
वेगळी कुटुंब ,
एक परिवार होतात .

तारेवरची कसरत ,
होते थोडी कधी .
याचीचतर मजा आहे ,
खऱ्या संसारामधी .

रुसवे फुगवे कधी ,
भांडनेही होतात .
सुखं गेली तशी ,
दुःखही जातात .

कुणी म्हणतं लग्न ,
झाली एक सजा आहे .
तडजोडीचं तंत्र कळलं ,
तर यातच खरी मजा आहे .

समजुतीने दोर संसाराची ,
हातामध्ये घ्यावी .
कधी तू , तर कधी मी
माघार घेऊन बघावी .

काय होईल जर ,
गमक कळले खरे .
संसारातून दोघा ,
तर सुख मिळे पुरे  .

डोंबारीच्या खेळातल्या ,
दोरीवर चालणे .
कसरत करत सारी ,
दुःखही झेलणे .

भातुकलीचा खेळ ,
खरा होईल मग .
डोळ्यांमध्ये एकमेकांच्या ,
दिसेल त्यांना जग .

लपंडावाचा खेळ ,
सुख दुःखे खेळतील .
राज्ये परत देण्यासाठी ,
धप्पे खूप मिळतील .

राज्य घेत राहावं ,
दुनिया बोले काही ,
राज्य किती आली ,
तरी खेळ संपत नाही .

लग्न म्हणजे असा ,
काही अजबच खेळ असतो .
दोन मनांचा जमलेला ,
अप्रतिम मेळ असतो .

- अभिषेक पांचाळ