चिमणी

Started by शिवाजी सांगळे, May 15, 2016, 12:38:34 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चिमणी

     सकाळी सकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने जाग आली, कुतुहलापोटी डोकावून पाहीलं तर चारपाच चिमण्यांची लगबग, धावपळ दिसली.

     जमिनीवर यायचं गवत, कापूस, पिसे, तार, धागा वगैरे जे मिळेल ते साहित्य इवल्याश्या चोचीत पकडायचं आणि भुर्रकन उडून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही जाउन त्यांची नीट मांडणी करायची, पुन्हा खाली उतरायचं, परत जे मिळेल ते उचलायचं व उडून जायचं, बराच वेळ हे चक्र सुरू होतं, आणि हे नक्की किती काळ सुरू रहाणार हे  सांगता येत नाही.

     एकंदरीत पावसाळ्याची चाहुल लागली होती तर त्यांना? घरटं बांधुन पिलांची सोय करणं चालू होतं? मला खरोखर कौतुक वाटलं या छोट्या जीवांचं, किती ते कष्ट? एक एक काडी जमवायची, घरटं बांधायच, कुठे लोन साठी अर्ज नाही, कसली परवानगी नाही, फक्त तुम्ही आम्ही फेकून दिलेल्या वस्तु वापरून घरटं बाधायचं, फार शहाण्या सारख वागतात ना हे छोटे जीव?

     एरवी हि पाखरं अशी धावपळ करतांना दिसत नाहीत, फक्त पोटासाठी लागणार्‍या रोजच्या अन्नासाठी भटकंती असते त्याची, घरट्या साठी मात्र पावसाळ्या पुर्वी यांची लगबग सुरू असते, तसा तर त्यांचा विणीचा काळ वर्षभर असतो, पण पासाळ्यात विशष काळजी घ्यावी लागते ना त्यांना?

     चिमण्यांच आयुष्यमान नक्की किती हे सांगता येत नाही, तरीही अंदाजे पंधरा ते अठरा वर्षाचे आयुष्य असावं. या सार्‍या जीवन प्रवासात त्यांचे अखंड परीश्रम सुरू असतात, आपल्या नजरेतुन ते स्वछंद आयुष्य असते, परंतु "जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे" म्हणतात हेच सत्य.

     मानवाला खरं तर निसर्गाच्या या दुतांच पशु, पक्षी व अन्य प्राण्यांच निरीक्षण करायला हवं व त्यातुन आवश्यक, उपयोगी बाबींच अनुकरण करायला हवं, खरोखर आयुष्य सुंदर होईल.

     मानवा व्यतिरीक्त अस्वल, मुंग्या व उंदिर सोडल्यास निसर्गातील कोणताच जीव साठेबाज वा हावरा नसावा? तसं जीवनचक्र परस्परांवर अवलंबुन तर आहेच त्याही पेक्षा परस्पर पुरक जास्त आहे. आपण त्यांना वाचवु ते आपल्याला सांभाळतील, याच भावनेतुन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी "वृक्ष वल्ली आह्मा सोयरी वनचरे" सारखा बोधप्रद अभंग लिहीला.

     आजची स्थिती वेगळी आहे, बेसुमार जंगल तोड व शहरीकरणाने होती नव्हती ती जंगल संपत्ती नष्ट होउ लागली, सिमेंट काँक्रीट व डांबर वगैरे मुळे उष्णता वाढू लागली त्याचा परीणाम सर्व प्राणी मात्रांवर होउ लागला, मानवाने कुलर,  ए सी वापरणं सुरू केलं, त्याच्यामुळे घरात थंडावा आला खरा पण बाहेर उष्णता वाढलीच. मानवा सारख्या सोई सुविधा हे जीव कशी करून घेणार? अपवाद काहि श्रीमंतांकडची जनावरे, पक्षी सुद्धा एसी त असतात म्हणे.

     खैर विषय चिमण्यांचा होता ना? आता तर मोबाईल टाँवरमुळे, शहरातून त्याही कमी झाल्या आहेत, वाचवायला हवं त्यांना, जसं जसं ऐकू येउ लागलं तेव्हां पासुन चिमणी जीवनाचा भाग झाली, उगीच नाही एक घास... ऐकत मोठे झालो, मुलगी झाली तर माझी चिवु म्हणत उराशी कवटाळली असेल ना कधी काळी?

     तर मला आता असं म्हणावं लागेल कि "मुलगी वाचवा समाज वाचवा"
आणि
"चिमणी वाचवा निसर्ग वाचवा"

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941 +919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९