दत्त उधारीचा धंदा

Started by विक्रांत, June 26, 2016, 07:07:37 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दत्त उधारीचा धंदा
करतो दिवाळखोर
नात्या लावूनिया चूड
करी उभा रस्त्यावर

हाती देऊनिया झोळी
जाळे सारा अहंकार
ज्याने जपले स्वतःला
त्याचा संपला बाजार

दत्त अपमानी पाढा
देई घडोघडी मार
सुखे जमविली त्यांच्या
होती चिंध्या चिंध्या पार

दत्त नाही बा सुखाचा
हाती गुलदस्ता दिला
दत्त लोहार घिसाडी
फेके आगी फुफाट्याला

दत्त कैवल्याची मूर्ती
देई एकच लंगोटी
दत्त पुरवितो आर्ति
जन्म होता करवंटी

कुणी म्हणतो मजला
दत्ते महाल दिधला
हाय नादान फसला
डोही अमृताच्या मेला

दत्त नव्हे झाडपाला
जो की निववी रोगाला
दत्त नव्हे हंडा मोठा
गुप्त धन साठवला

दत्त नव्हे रे नोकरी
पोटपाण्यास लागली
दत्ता मागती जी पोरे
वाया जगुनिया मेली

दत्त कृपणाला भला
चिंतामणी सापडला
कष्टे मिळवून तया
नका विकू कवडीला

दत्त दत्तासाठी म्हणा
जन्म देवून दत्ताला
दत्त हृदयात ठेवा
नका उरवू स्वत:ला

देह सोडता विक्रांत 
दत्त मायबाप झाला
घेई कडेवरी सदा
सारा पसारा सरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/