तुझे गीत गाऊ दे...

Started by शिवाजी सांगळे, June 26, 2016, 09:57:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तुझे गीत गाऊ दे...

दर वर्षी तु येतोस, सर्वांना सुखावतोस, पण मागील काही वर्षांपासून तू जरा रूसलास तरीही नको तेव्हा बरसलास. का रे तू असा वागलास? तुला माहीत आहे तुझ्यावाचून आम्हीच काय, सारी सृष्टी काहीच करू शकत नाही.

पृथ्वीवरील सारे जीव तूझ्या वाचून शुन्य आहेत, तूझ्या अमृतमयी थेंबानी सारी धरा शहारून येते, तीचं स्वतःचं रूप तुझ्या केवळ जाणिवेने बदलून जातं, पशु,पक्षी सारं काही नवसंजीवनी मिळाल्या सारखे ताजे तवाने होउन जातात. काल तुझं अस्तित्व जाणवलं, खिडकीत येउन तुला नमस्कार केला, मनातुन प्रार्थना केली कि "बाबा रे यंदा तु थोडासा लेट झालासं, काही हरकत नाही, तसा तु लहरी नाहीस, पण आमच्याकडचे हवामान खात्याचे जे लोक आहेत ना, त्यांचे अंदाज मात्र नेहमी चुकिचेच ठरतात, आता हे तुला आणि त्यांनाच ठावूक, कि कोण कुणाची फिरकी घेतयं ते? असो, तरी यंदा तुला अशी नम्र विनंती कि जरा मन मोकळा ये, आणि सर्व दूर ये, नाही तर काही ठिकाणी खुप दिवस तु मुक्काम करतोस, पार दैना होते रे सार्‍यांची, आणि ज्या ठिकाणी नाही येत त्यांची पण अवस्था चांगली नसते रे, समजुन उमजुन ये जरा, कारण तुला माहितच आहे कि तुझ्या शिवाय कुणाचेच पान हलणार नाही.

मला माहित आहे, मी तुला एवढं सागळं सांगतोय तरीही आमच्या पण काही चुका आम्हाला मान्य करायलाच हव्यात, आम्ही तुझा, तुझ्या निसर्गाचा सारा ढाचाच बदलून टाकला, नको इतकी जंगलतोड केली, शहरीकरणाच्या नावा खाली डोंगर फोडून तुझ्या हक्काचा थांबा हिरावून घेतला, तू जर थांबलाच नाहीस तर बरसणार कसा? याचं सुध्दा आम्हा मुर्खांना भान राहिलं नाही. नुसत्या ईमारती बांधत राहीलो, त्या साठी अमाप झाडे तोडली, पर्यायाने जमिनीची धुप होउन तुझे जमा होणारे पाणी सुद्धा समुद्राकडे निघुन जाउ लागले, परिणाम स्वरूपी माळीन, ॠषीकेश वगैरे सारख्या घटना घडून गावेच्या गावे वाहून, गायब होउन गेली, म्हणजे तु व्यवस्थित बरसुन सुद्धा आमचे नियोजन नसल्या मुळे व कळत असुन वळत नसल्या मुळे, तुलाच दोषी ठरवायची खोड आम्हाला लागली. हे वरूण राजा आमची हि कृत्ये एकदा विसरून आम्हाला क्षमा कर.

यंदा येउन सारा जुना हिशोब चुकता कर आणि सार्‍या जगताला शांत कर, पुन्हा एकदा हि धरणणी सुजलांम् सुफलांम् होउ दे, सगळ्यानी आनंदाने तुझे गीत गाउ दे.

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९