नववर्षाचा संदेश...

Started by suryakant.dolase, December 30, 2009, 08:12:20 PM

Previous topic - Next topic

suryakant.dolase

नववर्षाचा संदेश...

जसे गढूळपणाला
हमखास निवळावे लागते
तसे उगवत्यालाही
हमखास मावळावे लागते.
जुने जेंव्हा खंगत असते
तेंव्हा नवे कुणी रांगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते....

वर्ष,महिने,दिवस
आपण असे टप्पे पाडतो
तास,मिनिट,सेकंदासारखे
सोईनुसार कप्पे पाडतो
काळाचे खेळी तेंव्हा
अनंतात रंगत असते
नव वर्ष आपल्याला
हेच सांगत असते....

आशेला लागुनच
निराशाही येत असते
आपल्या स्वैर स्वप्नांनाही
अचूक दिशा देत असते
एकाचे यशस्वी होईल
तेंव्हा दुसर्याचे भंगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते.....

नवा नसतो सूर्य,
प्रकाशही नवा नसतो,
कॅलेन्डरच्या फ़ड्फ़डाटाने
आपल्याला तो नवा भासतो
कुणी करतो संकल्प,
कुणी नशेत झिंगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते......

गेलेली संधीही
पुन्हा परत आणता येते
आत्मविश्वासाच्या बळावर
भविष्य़ही जाणता येते
उगीच वर्तमानाला विसरून
कुणी भूतकाळात रंगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच सांगत असते....

त्रुटी कमी करून ,
चुका मात्र टाळल्या पाहिजेत
तुमचा जयघोष ऎकुण
लोकांना दिशा कळल्या पाहिजेत
कस्तुरीची किर्ती कशी
नकळत पांगत असते
नव वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते......

नव्याला सामोरे जाताना
जुन्याला थारा नको
पूर्वेच्या स्वागताला
पश्चिमेचा वारा नको
आपला गंध
आपल्याला कळावा
जशी गाय
वासराला हूंगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच सांगत असते.....

कोणताच माणूस कधी
आनंदासाठी भांडत नाही
त्याच्याशिवाय मनातला कचरा
बाहेर कधी सांडत नाही
मोकळ्या मनाने भांडले की,
शत्रुत्व भंगत असते...
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते......
धावपळ पाठिशी असली तरी,
आनंदाचे गाणे गायले पाहिजे
डोळेही तेच बघतात
त्याला जशी संगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते......


वर्षांमागे वर्षॆ
अशीच तर सरून जातात
एका वर्षाने माणसं
पुन्हा नव्याने तरूण होतात
ते कसले तरूण?
ज्यांच्यात म्हातारपण रांगत असते
नवे वर्ष आपल्याला
हेच तर सांगत असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)


santoshi.world


MK ADMIN


rudra



Mayoor

मोकळ्या मनाने भांडले की,
शत्रुत्व भंगत असते...

Really Very Nice.....