ही गोष्ट कोणाची? - भाग १

Started by ninavi, July 16, 2016, 12:34:49 PM

Previous topic - Next topic

ninavi

ही गोष्ट मला खरं तर तिच्या नजरेतून लिहायची होती. पण मला तिच्या नजरेतल्या भरपूर गोष्टी ज्ञात नाहीत. आणि मला त्या गोष्टी ज्ञात करून घ्यायची इच्छाही नाही. का कराव्यात? तिने काही महान मोठे कार्य केलेले नाही. किंवा कुठे एखादा गडही जिंकला नाही. तिच्या नजरेत शक्यतो तिने फार मोठे गड सर केले असतील, तिला आवश्यक असलेल्या गोष्टी जरी मिळविल्या असतील, ती कितीही आनंदात असेल पण तरीही तिने आज भरपूर काही गमावलंय. तिच्या त्या आनंदामुळे कित्येकजण कोणत्या परिस्थितून जात असेल याची ती कधीच कल्पना करू शकत नाही. कारण तिच्यात एवढी बुद्धिमत्ता उरलेलीच नाही.  याची तिला सध्या तरी कल्पना नसेल, तिला गरज वाटत नसेल पण भविष्यात तिला या गोष्टीची गरज नक्कीच वाटेल. ही गोष्ट तिची आहे की माझी आहे की आमच्या घराची आहे हे मला खरंच माहित नाही. पण एवढं सांगू शकतो हे लिहायला मला तिनेच भाग पाडलं.
   या सगळ्याला शिक्षणच कारणीभूत आहे. मी असं कधीच म्हणणार नाही की यात शिक्षणाची चूक आहे. याची सुरुवात तिच्या दहावीनंतर चालू झाली. दहावीनंतर पुढे प्रवेशाची तयारी चालू होती. तसेही तिला काही खास मार्क्स मिळाले नव्हते. गावातच तिने आर्टस्ला अकरावीला जावे अशी माझी तरी इच्छा होती. तशीपण ती माझी क्लासमेट्स सुद्धा होती(माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी असून सुद्धा). शेवटी काही होवो पण तिला डिप्लोमाला प्रवेश घेण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केला.  झालं. शेवटी ही वडिलांची इच्छा होती. मी सांगून सांगून दमलो की डिप्लोमा हा तिच्यासाठी नाहीच. पण वडिलांना शिक्षणाची आवड होती. आपली मुले खूप शिकवीत हीच त्यांची इच्छा होती. पण हीच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक होती. तुम्हाला याबद्दल काहीच वाटत नसेल पण जेव्हा तुम्ही पुढे जाऊन वाचसाल तेव्हा तुम्हाला सुद्धा या गोष्टीची जाणीव होईल. मला वाटतंय मी सुरुवातच बदलली पाहिजे तरच तुम्ही व्यवस्थित या कहाणीचा सार जाणून घेऊ शकता. तसं पण तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटून घ्यायचंय हा तुमचा प्रश्न. पण मी जेव्हा या गोष्टीची सुरुवात बदलेल तर नक्कीच तुम्हाला माझ्या रागाची जाणीव कळेल. हा आणखी एक, हे सांगायला मी वेळ नाही लावणार की, मी लिहिणारा, जो ही गोष्ट लिहित आहे तो म्हणजे तिचा भाऊ. सख्खा नव्हे तर सावत्र. येथे सावत्र लिहिणं गरजेचं होतं. असं लिहिलं असलं तरीही आमचं नातं सख्खं होतं. एकमेकांच्या खोड्या करणे, खेळणे, मस्करी करणे या सर्व गोष्टी आमच्या रोजच्याच होत्या. परंतु ही गोष्ट आमच्या नात्याची नाहीच. ही गोष्ट आहे तिच्या स्वार्थाची. आता जेव्हा मी एक व्यवस्थित सुरुवात करेल तेव्हा तुम्हीही माझ्या मस्तकात चालणारी चलबिचल समजू शकाल, मी हे का लिहितोय याची तुम्हालाही जाणीव होईल.
   हे सांगणं गरजेचं आहे. सांगितलंच पाहिजे. हेच आहे की जे तुम्हाला या गोष्टीबद्दल विचार करायला भाग पाडेल. माझ्या वडिलांची दोन लग्न झाली. परिस्थिती तशीच होती. ती वेळच वाईट होती. मला याबद्दल जास्त भाष्य करायचच नाही. कारण ही गोष्ट वडिलांच्या लग्नाची नाहीच. ही फक्त  एक गोष्ट आहे. इथे फक्त माझे विचार आहे, माझ्या वेदना आहे, संताप आहे, आनंदसुद्धा आहे(शक्यतो). त्यांच्या एका पत्नीला(धाकटीला) चार मुली तर एकीला(थोरलीला) दोन मुले. ती धाकटीचीच. हा आणि इथे झाली सुरुवात. माझे वडील फक्त तिसरी शिकलेले. कारण त्यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्व कधीच कळलं नाही. तसंही आमचा समाज हा भटका, मागासलेला. कधी या जागेवर तर कधी त्या जागेवर भटकंती चालूच असायची. पण जेव्हा दारूच्या धंद्याची साथ मिळाली तेव्हा पैसे मिळायला लागला. शेवटी एक चांगल्या जागेवर स्थायिक व्हायला मिळालं. आता आमची ७ ते ८ घरं एक गावात, एका वस्तीवर स्थिरस्थावर झाली होती. गावठी दारूने त्यांना सावरलं होतं. त्याच पैशातून पुढे जमिनीही विकत घेतल्या. पण शेवटी प्रत्येक जन अशिक्षितच. जेमतेम पैसा येत होता घरात. म्हणजे उदरनिर्वाह तर होतच होता. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण दारूचा धंदा सोडणं शक्य नव्हतं कारण सध्या तरी तेच साधन होतं उदरनिर्वाहाचं. आता माझे वडील जे तिसरी शिकलेले आणि आईही कधी शाळेत न गेलेली. पण त्यांना मात्र शिक्षणाचं महत्त्व कळलेलं म्हणूनच या सगळ्यातून दूर ठेवण्यासाठी आणि मोठ्या पोराच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी दारूच्या धंद्यातूनच २ आठवड्यात रात्रंदिवस मेहनत करून रुपये १५००० कमविले आणि त्याला पुण्यात फार मोठ्या सैनिकी विद्यालयात दाखल केले(ज्युनिअर केजी) . माझा मोठा भाऊ तेव्हा फक्त ४ वर्षाचाच होता. वडिलांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण केलं जे करण्याची त्यांची इच्छा होती. इथे मला हे सांगायला नक्कीच आवडेल की, वडील जरी फक्त तिसरीच शिकले असतील तरीही ते गणितात एकदम हुशार होते. बेरीज वजाबाकी तर ते तोंडीच करायचे आणि गुणाकार-भागाकारात तर त्यांना तोडच नव्हती. भाज्य = भाजक * भागाकार + बाकी ही गोष्ट मला तिसरीलाच असताना त्यांच्याकडूनच कळली. मी व माझ्या बहिणी गावातच शाळा शिकायला होतो. वडिलांनी आमच्याकडून तर भागाकार पक्का करून घेतला होता.
   मला या ठिकाणी कधीही दारूच्या धंद्याची जाहिरात करायची नाही. पण एक सांगायचय की तो दारूचा धंदा म्हणजे आमची लक्ष्मी होती त्यामुळे मी त्या गोष्टीला कधीच नावं ठेवणार नाही. ज्यामुळे आम्ही एवढं शिकलो. हा एकदा मी शाळेत शिकलो की दारू ही वाईट असते म्हणून घरी येऊन जेव्हा दारूच्या १० लिटरच्या पिशवीला जेव्हा लाथ मारली तेव्हा वडिल चक्क पिशवीच्या पाया पडले व माफी मागितली. तेव्हा मला कळलं की या गोष्टीचा अपमान करणं चुकीचं आहे. कारण ती आहे म्हणून आपण आज इथे आहे, आपण इथे शिकतोय. वडिलांनी कोणत्या हलाखीच्या परिस्थितून हे सगळं उभं केलंय याची जाणीव झाली.
क्रमश:..