अर्थाविना काही अर्थ नाही

Started by sachinikam, July 20, 2016, 12:05:10 PM

Previous topic - Next topic

sachinikam


अर्थाविना काही अर्थ नाही


करी फत्ते काम जेव्हा करी पडे दाम
मिळे मोठे नाम जेव्हा मिळे मोठा दाम.


लाभेल उद्या आराम जर आज मिळेल दाम
आयुष्यातील व्याकरणाला हाच देई पूर्णविराम.


द्रव्य देऊन द्रव्य घेतल तरी द्रव्याची तहान भागत नाही
वीस कोटींचा बांधला बंगला तरी विसावा मात्र मिळत नाही.


शंभराची नोट झाली रुपयाएवढी
जेव्हा डोक्याचे गेले अन पिकली दाढी.


अर्थार्जन जरी असला पुरुषार्थ दुसरा
याच्या मोहात पडला की बाकी सगळे विसरा.


गुंतवीत ह्याला सुटेना हा गुंता
चितेपरी जाळी मज ह्याची चिंता.


ऐशी आहे आपल्या नेत्यांची ख्याती
जनतेला हे लुबाडून खाती
स्वीझला हवी भरभरून खाती.


पैशाचा जो झाला दास
गोड ना लागी त्याला घास.


ठेवण्यासाठी ठेव केली नसती उठाठेव
शेंदूर फासला दगडास आणि पावला की हो देव.


वित्त वित्त करता संचय हरवले चित्त
खवळायला पित्त लागे क्षुल्लक निमित्त.


आहेत दात तोवर खाऊया चणे
बाकी उरते शून्य करता यास ऊणे.


पैसा नाही लागत झाडाला आणि पिकत पण नाही पाडाला.


कामे करी फटाफट फेकल्यावर बंडल
थोबाड होई सटासट मारल्यावर सँडल.


ज्याच्या हाती पैसा त्याला पुसती नाती
काय उपयोग दारिद्र्याची जरी असली सुपीक माती.


पैसा मुळी गैर लावी भावंडांत वैर
अरे सोडा पिसा हा भ्रम
आणि खोला खिसा गरम.


हाच असतो कारण राब राब राबण्याला
हाच बनतो सारण चाल बोल वागण्याला
अर्थ असेल तरच अर्थ ह्या जगण्याला
अर्थविना काय अर्थ फुकटचे मरण्याला.
----------------------------------------------
कवी: सचिन निकम, पुणे.
कवितासंग्रह: मुक्तस्पंदन
sachinikam@gmail.com
९८९००१६८२५
----------------------------------------------

sachinikam

हाच असतो कारण राब राब राबण्याला
हाच बनतो सारण चाल बोल वागण्याला
अर्थ असेल तरच अर्थ ह्या जगण्याला
अर्थविना काय अर्थ फुकटचे मरण्याला.

sachinikam

अर्थाविना काही अर्थ नाही