मला भेटली भारतमाता

Started by Vinod Thorat, August 02, 2016, 10:46:28 AM

Previous topic - Next topic

Vinod Thorat

मला भेटली भारतमाता

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला लालकिल्ल्यावर भेटली मला भारतमाता
पाणावल्या डोळ्यांनी सांगू लागली तिची व्यथा
मूळची शुभ्र वस्त्र बघ आता कशी झालीयेत जीर्ण
निष्पाप जीवांच्या रक्ताचे शिंतोडे करतायेत मला विदीर्ण

69 वर्षांपूर्वी बेड्यातून मुक्त झाल्याचा आनंद साजरा केलात तुम्ही
पण बेड्या सुटल्याच नव्हत्या कधी
फक्त कुलूपं बदलली
इंग्रजी कुलूपं जाऊन आली देशी बनावटीची
बेड्या मात्र अजून आहेत तशाच

अतिरेक्यांच्या गोळ्यांनी पडलेली छिद्र आता झाकताही येत नाहीत
पण गोळ्यांचे आवाज भ्रष्ट राजकारण्यांना ऐकूही आले नाहीत कधी
अन् कदाचित ऐकूही येणार नाही
कारण गेंड्याची कातडी पांघरलेल्यांना सत्तेशिवाय दुसरं काही सुचत नाही

कधी खैरलांजी कधी खर्डा तर कधी दादरी
निष्पापांचे जीव जातच आहेत
धर्म अन् जातींच्या निर्जीव भिंतीखाली
दिवसेंदिवस भिंती कोसळण्याच्या ऐवजी मजबूतच होतायेत

नेहमीच धुमासतोय काश्मीर अन् उफाळतोय नक्षलवाद
कधी तामिळी बंड तर कधी बोडोंचा उन्माद
कधी गुजरात तर कधी हरियाणा पेटतोय आरक्षणाच्या प्रश्नावर
माझीच लेकरं उठलीयेत माझ्या लेकरांच्या जीवावर

कधी दिल्ली कधी मुंबई तर कधी कोपर्डी
तोडले जातायेत लचके निरागस निर्भयाचे
नाकारला जातोय प्रवेश तिला मंदिरात अन् दर्ग्यातही
निघातायेत फतवे बुरख्यामागे तिचा आवाज टाकायला चिरडून

इथे राजकारणीच ठरवतायेत
कोण देशभक्त कोण देशद्रोही
कोणी काय खाव कुठे जावं
कोणी राहावं या देशात
कसं जगावं अन् कसं मरावही

एवढं बोलून गप्प झाली ती
ढकलून मला विचारांच्या खोल डोहात
अन् मी, महान भारतमातेचा एक क्षुद्र सुपुत्र
गढलोय याच विचारात
स्वराज्य मिळालं, सुराज्य कधी येणार?

- विनोद थोरात, जुन्नर
मोबा. 8983448219