एका पावसाळी संध्याकाळी तिचा आणि त्याचा वाद.. नेहमी सारखाच..

Started by maddy pathan, September 04, 2016, 11:01:27 AM

Previous topic - Next topic

maddy pathan



तो.. " सगळंच संपतं गं कधी ना कधी.. प्रत्येक नातं हे जेव्हा जोडलं जातं, तेव्हाच नियतीनं त्याचा शेवट कुठेतरी लिहून ठेवलेला असतो...

" ती.. " म्हणजे आपलं नातंही संपणार कधीतरी..? "

तो.. " माझा तसा अर्थ नव्हता.. मी generalized statement दिलं... every relationship has to end some day .

." ती.. " किती नकारात्मक बोलतोस..

" तो.. " खरं तेच बोलतो..

" ती.. "नाही.. मला नाही पटत असलं चुकीचं बोलणं.. खरं तर दोन व्यक्तींमध्ये नातं जोडलं गेलं की ते ना गोंदलं जातं काळाच्या पडद्यावर आभाळीच्या नक्षत्रासारखं...
ते असतंच कायम अस्तित्वात..
फक्त होतं काय तर त्याचे रंग बदलत जातात,
पोत बदलतो, सूर बदलतात, इतकंच.. पाण्याचा झरा असतो ना, तो कशी वाट काढत राहतो, वळणं वळणं घेत जातो, कधी जमिनीच्या पोटात गुडूप होऊन जातो पण पुन्हा दूर कुठेतरी बाहेर पडतोच.. त्या पाण्याच्या प्रवाहासारखंच नातंही घेत राहते जीवनातील अनोळखी प्रदेशांचा शोध..

" तो.. " अगं पण बाष्पीभवन होतंच ना पाण्याचं.. उन्हाचे चटके बसले की वाफ होते पाण्याची.. नातंही होरपळून जातं वास्तवाच्या धगीत आणि मागे राहते नुसती वाफ..

" ती.. " हो वाफ होते पण म्हणून संपून थोडीच जातं..? त्याचं अस्तित्व रहातच ना... आणि मग ग्रीष्म दाहाने वाफ झालेलं पाणी वर्षा ऋतूमध्ये पाऊस होऊन बरसतं त्याचं काय..?

" बाहेरचा पाऊस हातावर घेत ती बोलली.. बोटावरचा थेंब तिनं काळजीपूर्वक त्याच्या हातावर टेकवला आणि मूठ बंद केली..
तोही चिडलेला... तिला खिडकीजवळून बाजूला सरकवून त्याने खटकन खिडकी बंद केली.
तो आडमुठेपणाने बोलला.. " मी खिडकी बंद केल्यावर, पाऊस बाहेर, मी आत कोरडा.. मग काय करशील..?

" ती मुग्ध हसली.. समजून उमजून हसत उत्तरली... " पावसाचं पाणी म्हणजे जिवंत अन सळसळतं चैतन्य असतं.. ते मातीत रुजतं, मातीशी सलगी करतं.. एखादं बीज शोधतं, त्याला माया देऊन फुलवतं.. मग ते बीज अंकुरतं एखाद्या रोपट्याच्या रूपानं. त्याला फळ आलं तर तुझ्या पोटात जाऊन तुला जीवनरस पुरवेल, आणि फूल आलं तर त्याचा सुगंध भिंत किंवा तुझी बंद खिडकीही ओलांडून पोहोचेल तुझ्या नाकपुड्यांत..
" बोलतच तिने हळूच त्याच्या नाकावर टिचकी मारली. तो गोंधळला, बावरला.
तिला हसू फुटलं, पण त्याला हार मानायची नव्हतीच तिच्या समोर.. त्याचा सवाल..

" पण अगदीच बिनकामाचं गवत उगवलं तर, जनावरांच्या पण खाण्यालायक नाही असं, किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे विषारी वेल उगवली तर..?

" तिच्या चेहऱ्यावरचे हसू पुसून जाऊन तिथे आता वेदनेची कळ. त्याच्या चेहऱ्यावर मात्र जिंकल्याचा आनंद. तरीही तिचे हळवे उत्तर..
" बिनकामाचं माजलेलं गवतसुध्धा शेकोटीच्या कामी येतं, एखाद्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये ऊब मिळावयाला; आणि विषाचं म्हणशील तर काही नाती जपण्यासाठी आयुष्याचीही किंमत आनंदाने मोजावी लागते कधी कधी..

" तो स्तब्ध. अस्वस्थ आणि बेचैन. भले तो दगडासारखा कठोर असला म्हणून काय झालं, इतका हळवा हल्ला झाल्यावर कोसळणार नाही तर काय.. तिची शून्यात नजर.. "
कुठला पाऊस घेऊन येणार रे आपलं नातं ? माहीत नाही म्हणून आजकाल प्रत्येक पाऊस घेते अंगावर.. कुठल्या थेंबातून कुठला अंकुर फुटेल कोणी सांगावे..? "

मॅडी. फेसबुक आयडी Maddy Virah Kavita