एक पावूल विंगेत आहे ....

Started by विक्रांत, September 08, 2016, 12:34:09 AM

Previous topic - Next topic

विक्रांत



पुन:पुन्हा पत्र येत आहे
पुन:पुन्हा याद देत आहे
संपली इथली वस्ती आता
चालणे पुढची वाट आहे

आलो कशाला माहित नाही 
जन्मात फक्त वाहत आहे
ठाऊक नाही कुठे जायचे
कसे कोण चालवत आहे

वाढून ओघ दाटून पाणी
गाज कानात पडत आहे
बळा वाचून टिकले बहु
नशीब खूप नावेत आहे

ठेविले जे गाठीस बांधून 
निसटून ते पडत आहे 
सांभाळणे सावरणे माझे
अवघेच व्यर्थ होत आहे

मातीतील जगणे सुमार 
आज कुण्या पणतीत आहे
त्या दयाळू कुंभारास अन    
मन अजून शोधत आहे

तसा जाणतो कधीचाच मी
की जगतो नाटकात आहे 
अखेर ठावूक नसे तरी
एक पावूल विंगेत आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/