रीत

Started by शिवाजी सांगळे, September 08, 2016, 05:57:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९