चिमणपाखरू

Started by Asu@16, November 07, 2016, 05:11:34 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      चिमणपाखरू 

कसे अचानक चिमणपाखरू
अलगद माझ्या घरटी आले
वेड लावून माझ्या मनाला
भुर्रकन असे उडून गेले

या खांद्याहून त्या खांद्यावर
पोटावर तर कधी डोक्यावर
नाच नाचुनि हैराण केले
पण जगण्याचे भान दिले

कधी उडाले भरभर भरभर
चिवचिवाट नुसता घरभर घरभर
जीव माझा कधी अंगणी
आकाशी वा शुभ्र चांदणी

प्रेम देणारं प्रेम घेणारं
पाखरू असं वेड लावणारं
भावनांचं आकाश माझं
नाजूक पंखांवर तोलणारं

तहानभूक जगणे रमणे
सर्वस्व माझे चोरून नेले
कसे अचानक चिमणपाखरू
घरट्यातून या उडून गेले

क्षणात दिसते क्षणात नसते
भास मनीचे नुसते असती
आठवणींचे मेघ दाटता
अश्रूंची डोळ्यांना वसती

काळजाचा तुकडा माझ्या
चिमणपाखरा गाऊन बोल
असाच येऊन परत घरट्या
जगण्याचे गुज कानी बोल

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita