गांधीबाबा

Started by ajaynimbalakar, November 17, 2016, 10:59:35 AM

Previous topic - Next topic

ajaynimbalakar

"गांधीबाबा"
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?
तुमच्यासाठी होते हिंसा !
तुमच्यासाठी पेठा !
तुम्हीच नसाल खिशात मात्र तोच सिक्का खोटा.

तुमच्यासाठी काम, तुमच्यासाठी लोभ,
तुमच्यासाठी उण्या पायी हजार वाटा.
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?...१

तुमच्यासाठी होतात खुन,
हिरव्या शालुत जळते सून.
तुम्हाला तिथं कुणी नेला त्यांना पहिला जाऊन भेटा.
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?...२

तुमच्यासाठी कधी काळी,देश करायचा उपोषण.
आता तुम्हीच नसता जवळ म्हणून,घडतंय कुपोषण!
जन,गण,मन,सारेच का विसरलेत सज्जनपण?
अशी घुसमट तिथे राहून कसे काय सहन करता?
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?..३


तुमच्यसाठी भ्रष्टाचार ,हात सोडून बुडला सहकार.
चक्क वेश्या आता इथे पाळते आहे शिष्टाचार !
बापू आता पुनर्जन्माचा करा विचार.
असे महान आत्मा बनून कुठे बरे गायब होता?
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?...४


एक बाकी छान आहे,
सारेच जन जात सोडून तुमच्या पाया पडतात .
कितीतरी चमत्कार तुमच्यापायी घडतात !
जग म्हणता गांधींनी देश घडवला,
आता मात्र तुमच्यामुळे कोवळ्या कोवळ्या पिढ्या बिघडतात!
नोटेवरती निवांत राहून विनाश ऐसा कसे हो पाहता?
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?...५

आता कृपाकरून जागे व्हा, अन
पुन्हा काठी घेऊन हाती पुरता देश बदलुन टाका,
आता खरी गरज आहे तुमची,
आम्ही न्यायला येतो सांगा बापू तुम्ही कुठे राहता?
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?...६

कधीकाळी बापू होते प्रत्येकाच्या मनात,
आता मात्र नुसतेच आमच्या धनात,अन सरकारी दुकानात.
फोटोतून काढून आपणच गांधीना पुन्हा मनात वसवायला हवं.
अशा भ्रष्ट लोकशाहीत नागरीकाने गप्प राहणं बर नव्ह.

लोकहो देशाचा कणा वाकुन गेला तरी तुम्ही
गांधींचीच वाट का हो पाहता?
घ्या अहिंसेचा मंत्र,
उसळूदेत पुन्हा बदलाच्या लाटा.
सांगा बापू लढत्या जनतेस आशीर्वाद देण्या कधी येता?
गांधीबाबा नोटेवर तिरके राहून काय काय हो पाहता?
                                -अजय निंबाळकर
aj

guru21