'दहावीतलं प्रेम'

Started by rahudoc, December 01, 2016, 11:57:45 PM

Previous topic - Next topic

rahudoc

'दहावीतलं प्रेम'

सांजसकाळी तुला पाहण्याची घाई मला
तुझ्याविना एक क्षण करमत नाही मला
बोलू की नको बोलू अशी धास्ती लागे जीवाला
द्विधा ही माझी अशी, सांग, सांगू कुणाला???


जेव्हापासून आलीस तू समोरच्या घरामधे
घर करून राहतेस तू माझ्या मनामध्ये
टकमक टकमक तुझे टपोरे डोळे
नजर भिडवण्याची ना ताकद माझ्यामध्ये
चार नयनांची एकदा अशीच झाली भेट
रुतला तो क्षण, खोल काळजात जाऊन थेट
हसला जरासा, लाजला तुझा चेहरा
आणि माझं ही तसंच, आला अंगी शहारा
सुरु झाला हळूहळू डोळ्यांचा लपंडाव
पण कधी कधी तुला खुपच लागे गं भाव
हळूच दारावर पडदा सरकवशील
मन करी राडा, मला किती तरसवशील??

सांगू कुणाला, शोधू कुणाला अन् बोलू कुणाला??
नित्या म्हणे "अर्थच नाही अशा प्रेमाला"
शिरी म्हणे, "गल्ली गल्लीत तुझाच बोलबाला"
सांजसकाळी तुला पाहण्याची घाई मला

काळजी आता वाटू लागली जीवाची
आवडच नव्हती कधी ह्या विषयाची
प्रेम आहे की आहे 'मोह' वरवरचा?
जपतो मी हाती माळ तुझ्या नावाची

काहीच नाही मला बोलण्यासाठी
पण आसुसले कान तुझ्या आवाजापोटी
अगं, कधी तरी येऊदे नाव तुझ्या ओठी माझं
चातकासारखी वाट पाहतोय तुझ्या भेटीसाठी

आज कुणीतरी आलं तुझ्या दाराशी
चार वर्षाचं लेकरु त्याच्या ऊराशी
खूष आज दिसते तू जराशी जास्तच
घालमेल सुरू झाली माझी मनाशी

'मम्मी' असं बोललं ते बाळ मनाचा घात झाला
रडवेला चेहरा माझा, घसाही दाटून आला
पोपट झाला, तोंड दाखवू आता कशाला?
प्रेमाचा झरा माझा वाहण्याआधीच आटून गेला

सांगू कुणाला, शोधू कुणाला अन् बोलू कुणाला??
आई म्हणे मला," तुझं लक्ष नाही कामाला?"
बाबाही म्हणाले, " नाही अक्कल नालायकाला"
सांजसकाळी तुला पाहण्याची घाई मला

सांजसकाळी तुला पाहण्याची घाई मला
तुझ्याविना एक क्षण करमत नाही मला
बोलू की नको बोलू अशी धास्ती लागे जीवाला
द्विधा ही माझी अशी, सांग, सांगू कुणाला???


                                                        डॉ. राहुल पाथ्रीकर